नवी दिल्ली : कोरोनाकहरामुळे बसकण मारलेल्या अर्थव्यवस्थेचे गाडे आता पुन्हा एकदा रुळावर येऊ लागले आहे. कर संकलनात होऊ लागलेली वाढ आणि आठ महिन्यांत प्रथमच एक लाख कोटींहून अधिक झालेले वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन यामुळे अर्थव्यवस्था उभारी घेऊ लागली असल्याची सुचिन्हे आहेत. दिवाळीमुळे येत्या काळातही बाजारात खरेदी-विक्रीचा जोर वाढणार असल्याने नोव्हेंबरमध्येही करसंकलन वाढण्याची शक्यता आहे.
कोरोना महासाथीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून कर संकलनाने गती घेतली असल्याचे केंद्रीय अर्थसचिव अजयभूषण पांडे यांनी सांगितले. वस्तूंच्या वाहतुकीसाठी गरजेच्या असलेल्या ई-वे बिलांची संख्या कोरोनापूर्वकाळाएवढी होणे, ऑनलाइन पेमेंट्सच्या संख्येत झालेली वाढ, जीएसटी संकलनात सलग दुसऱ्या महिन्यात झालेला सुधार हे सर्व अर्थव्यवस्था मार्गावर येत असल्याचे द्योतक आहे, असे पांडे म्हणाले.
५० हजारांहून अधिक किमतीच्या मालाची वाहतूक होणार असेल तर ई-वे बिल सादर करावे लागते. त्यात ऑक्टोबर महिन्यात २१ टक्क्यांनी वाढ झाली असून ई-इन्व्हॉइसची संख्याही प्रतिदिन २९ लाख झाली असल्याचे केंद्रीय अर्थसचिवांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टर्थ निदर्शनास आणून दिले.
७२,८२८कोटी रुपये एवढे जास्त कर संकलन एप्रिलच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये झाले आहे. या महिन्यात नवरात्रौत्सव असल्याने खरेदी वाढलेली पाहायला मिळाली. त्यामुळे करसंकलन वाढले.
सलग दुसऱ्या महिन्यात वाढ
फेब्रुवारीपासूनच्या आठ महिन्यांत जीएसटीचे संकलन प्रथमच १ लाख कोटींपेक्षा अधिक झाले. ऑक्टोबरमध्ये जीएसटीचे संकलन १ लाख ५ हजार १५५ कोटी रुपये एवढे झाले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलनात वाढ नोंदवली गेली आहे, हे विशेष.
गतवर्षीच्या तुलनेत जीएसटीतून हाेणाऱ्या करसंकलनाचे प्रमाण कमी असले तरी कोरोनाकहरातही अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी नोंदवली. एकूण महसुलात घट झाली असली तरी केंद्राने गेल्या सात महिन्यांच्या काळात प्राप्तिकर आणि जीएसटी परताव्यांच्या स्वरूपात तब्बल २ लाख कोटी रुपये करदात्यांना अदा केले आहेत. करचुकवेगिरी होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना केल्याने करदात्यांची संख्या वाढली असून कर संकलनात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
- अजयभूषण पांडे,
केंद्रीय अर्थसचिव