Join us  

बाजाराच्या सावध पवित्र्याने अस्वलाची मिठी

By admin | Published: January 23, 2017 1:15 AM

जीएसटीची लांबलेली अंमलबजावणी, नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धिदराबाबत व्यक्त केलेली शक्यता, अमेरिकेत झालेले सत्तापरिवर्तन

जीएसटीची लांबलेली अंमलबजावणी, नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धिदराबाबत व्यक्त केलेली शक्यता, अमेरिकेत झालेले सत्तापरिवर्तन, विविध आस्थापनांचे जाहीर झालेले निकाल, यामुळे सप्ताहाच्या अखेरीस गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आणि नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीने अखेरच्या दिवशी बाजारावर अस्वलाचे राज्य निर्माण झाल्याने निर्देशांक खाली आले.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह संमिश्र असला, तरी अखेरीस झालेल्या विक्रीने तो लाल रंगात संपला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये २७४२२.६७ ते २७००९.८१ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २७०३४.५० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो २०३.५६ अंश म्हणजेच ०.७ टक्क्यांनी घटला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८३४९.३५ अंशांवर बंद झाला. तो ५१ अंश (०.६ टक्के) खाली आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही घट झाली.जीएसटी परिषदेच्या बैठकीत काही मुद्द्यांवर मतैक्य झाले असले, तरी त्याची अंमलबजावणी मात्र १ जुलैपर्यंत लांबल्याचा बाजारावर विपरित परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धिदरामध्ये घट होण्याची व्यक्त केलेली शक्यताही बाजाराची चिंता वाढविणारी ठरली. गतसप्ताहाच्या अखेरीस आलेले काही आस्थापनांचे तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आल्यानेही बाजारावरील विक्रीचा दबाव वाढला.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सूत्रे स्वीकारली. पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी अमेरिका फर्स्टचा उल्लेख केला आहे. त्याचे बाजारावरील परिणाम सोमवारी बघावयास मिळतील. मात्र, ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणापूर्वीच गुंतवणूकदारांनी नफा कमविण्याचे धोरण स्वीकारून आगामी काळाचे संकेत दिले आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हनेही व्याजदरांबाबत सावध भूमिका स्वीकारलेली दिसते.- शेअरसमालोचन: प्रसाद गो. जोशी