Join us

वाहन कंपन्यांच्या विक्रीमध्ये जुलैमध्ये झाली भरघोस वाढ, आर्थिक स्थैर्य आणि वाढत्या मागणीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 11:51 AM

कोरोनाचा कमी होत असलेला प्रसार, देशाला लाभत असलेले आर्थिक स्थैर्य आणि वाढलेल्या मागणीमुळे जुलै महिन्यात प्रमुख वाहननिर्मिती कंपन्यांच्या विक्रीमध्ये भरघोस वाढ झाली असून, त्यामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या वाहन उद्योगाला दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा कमी होत असलेला प्रसार, देशाला लाभत असलेले आर्थिक स्थैर्य आणि वाढलेल्या मागणीमुळे जुलै महिन्यात प्रमुख वाहननिर्मिती कंपन्यांच्या विक्रीमध्ये भरघोस वाढ झाली असून, त्यामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या वाहन उद्योगाला दिलासा मिळाला आहे. मागील वर्षापासून वाहन उद्योगाला सातत्याने विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे. 

जुलै महिन्यामध्ये झालेल्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, त्यामधील वाढ समाधानकारक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती- सुझुकीच्या विक्रीमध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली आहे. जुलै महिन्यात या कंपनीने १ लाख ६२ हजार ४६२ कारची विक्री केली आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीमध्ये ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांमधील वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. 

ह्युंदाई मोटार इंडियाच्या जुलै महिन्यातील विक्रीमध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात या कंपनीच्या ४८ हजार ४२ वाहनांची विक्री झाली आहे. कंपनीने आणलेले नवीन मॉडेल तसेच अन्य लोकप्रिय ब्रॅण्डच्या चांगल्या विक्रीमुळे ही वाढ झाली आहे. कंपनीचे संचालक तरुण गर्ग यांनी सांगितले की, चांगला झालेला पाऊस, कोरोनाचे कमी होत असलेले रुग्ण यामुळे बाजारपेठेतील गर्दी वाढत असून, लोकांकडून अधिक प्रमाणात मागणी येऊ लागली आहे. वाहन उद्योगासाठी ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टाटा मोटर्स आणि एमजी मोटर्स इंडिया यांनीही आपल्या वाहनांच्या विक्रीमध्ये सुमारे दुपटीने वाढ झाल्याचे सांगितले आहे. एमजी मोटर्सने जुलै महिन्यातच आपली विजेवर चालणारी कार बाजारात आणली असून, तिचे बुकिंगही सुरू केले आहे. या कारच्या बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान राॅयल एनफिल्ड या दुचाकी उत्पादकांनीही जुलै महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विक्रीमध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झाल्याचे घोषीत करण्यात आले आहे. या कंपनीने जुलै महिन्यात ४४ हजार ३८ दुचाकींची विक्री केली आहे. जूनपेक्षा ती वाढली आहे.  

स्कोडाच्या विक्रीमध्ये तीनपटीने वाढस्कोडा ऑटोच्या विक्रीमध्ये जुलै महिन्यात तीनपटीने वाढ झाली आहे. कंपनीने या महिन्यात बाजारात आणलेल्या नवीन वाहनांना चांगला प्रतिसाद लाभत असल्याने ही उडी मारणे कंपनीला शक्य झाले आहे. होंडा कार्सच्या विक्रीमध्ये जुलै महिन्यामध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात कंपनीच्या ६०५५ वाहनांची विक्री झाली आहे.  

विजेवर चालणारी चांगली वाहने उपलब्ध झाल्यास त्यांना भारतीय बााजरामध्ये चांगले ग्राहक मिळू शकतात, हेच आमच्या कारला मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट होत आहे.  -राजीव छाब्रा,  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमजी मोटर्स इंडिया