गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाऊन लागू झाला होता. तेव्हापासून वाहननिर्मिती क्षेत्राचे चाक गाळात रुतले आहे. मधल्या काही काळात जसा कोरोनाचा आलेख घसरणीला लागला तसा थोडा आशेचा किरण दिसला होता या क्षेत्राला. वाहनांची मागणीही वाढली होती. परंतु आता पुन्हा एकदा या क्षेत्रावर भयसंकटाचे सावट आले आहे. ताजी आकडेवारीच दर्शवते आहे तसे. पुन्हा एकदा वाहननिर्मिती क्षेत्र घसरणीला लागले आहे... कोरोना सरला नाही आणि लॉकडाऊन कायम राहिला तर हे घसरण आणखी वाढण्याची भीती आहे.
- २८.६४% घट एकूणच सर्व प्रकारच्या वाहनांच्या नोंदणी आणि विक्रीमध्ये झाली आहे.
- लॉकडाऊनच्या या काळात रेल्वे आणि विमान वाहतूक काही अंशी बंद असल्याने प्रवासी वाहने हाच लोकांसमोर पर्याय होता. त्यामुळे अशा वाहनांची मागणी वाढल्याचेही दिसून आले आहे.
ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहनांनी तारले
शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेला तारले, तसेच शेतकऱ्यांनी वाहन निर्मिती उद्योगालाही हातभार लावला आहे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या ट्रॅक्टरच्या विक्रीत या मंदीतही मोठी वाढ झाली आहे. या वर्षभरात ट्रॅक्टरची विक्री २९ टक्के वाढली आहे.
सणासुदीच्या काळातील लॉकडाऊनचा फटका
एप्रिल महिन्यात गुढी पाडवा, उगाडी, बैसाखी इत्यादींसारखे सणवार येतात. या काळात वाहनांची मागणी वाढत असते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लागू होत असलेले लॉकडाऊन यांमुळे वाहननिर्मिती उद्योग धास्तावला आहे.