मुंबई : विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) वाहन व सुटे भाग क्षेत्रामधील कंपन्यांतील आपली गुंतवणूक काढून घेण्याचा धडाका मागील सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून लावला असून, त्याचा जबर फटका शेअर बाजाराला बसला आहे.
आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये वाहन व सुटे भाग कंपन्यांतील ४५४ दशलक्ष डॉलरचे समभाग विदेशी संस्थांनी विकले. ही विदेशी संस्थांची सातव्या महिन्यातील समभाग विक्री ठरली. एफआयआय संस्था ऑगस्ट २०२४ पासून वाहन व सुटे भाग क्षेत्रातील आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये सर्वाधिक १.२४ अब्ज डॉलरची गुंतवणूक विदेशी संस्थांनी काढून घेतल्याचे एनएसडीएलच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
दूरसंचार क्षेत्रात गुंतवणूक
एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये विदेशी संस्थांनी एकूण ५.३५ अब्ज डॉलरचे समभाग विकले. त्यात बांधकाम क्षेत्रातील सर्वाधिक ८२६ दशलक्ष डॉलरच्या समभागांचा समावेश आहे.
दूरसंचार क्षेत्रात मात्र ९१७ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक विदेशी संस्थांनी केली आहे. ऑगस्ट २०२४ पासून विदेशी संस्थांनी १८ अब्ज डॉलरचे समभाग विकले.
कमाईत झाली घट
५ मार्च रोजी जारी झालेल्या ‘जेएम फायनान्शिअल रिपोर्ट’नुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये निफ्टी-५० पैकी ३० कंपन्यांच्या प्रतिसमभाग कमाई अंदाजात घट झाली आहे. प्रत्येक सहा वाहन कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचा प्रतिसमभाग कमाई अंदाज घटला आहे.
ॲक्सिस म्युच्युअल फंडाचे मॅनेजर नितीन अरोरा यांनी सांगितले की, वृद्धीमधील मंदी अमान्य करता येण्याजोगी नाही.
निर्यातीतील संभाव्य सुधारणा सुटे भाग उद्योगाच्या पथ्यावर -
वाहन कंपन्यांचा वृद्धी अंदाज धोक्यात असतानाच सुटे भाग उत्पादक कंपन्यांचा वृद्धी अंदाज चांगला असल्याचे दिसून येत आहे. निर्यातीतील संभाव्य सुधारणा या क्षेत्राच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.
अरोरा यांनी सांगितले की, किमतीतील कपात आणि करसवलत यांद्वारे वाहन उद्योगाला या संकटातून वाचवले जाऊ शकते.