नवी दिल्ली : ९० च्या दशकात दूरदर्शनवर बजाज स्कूटरची जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. 'बुलंद भारत की बुलंद तस्वीर- हमारा बजाज...', अशी धून ऐकताच सर्वांचं लक्ष टीव्हीकडं जात होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर राज्य करणारा बजाज ग्रुप आता आरोग्यसेवा क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. आता स्कूटर बनवणारी कंपनी हॉस्पिटल बांधणार आहे.
बजाज ग्रुपने आरोग्य सेवा क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे. देशातील मेट्रो शहरांमध्ये हॉस्पिटल उघडण्याची कंपनीची योजना आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, बजाज ग्रुप हॉस्पिटल चेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. ज्याची सुरुवात मेट्रो सिटीपासून होईल. दरम्यान, कंपनी आधीच आरोग्य विम्यात सक्रिय आहे. आता कंपनीला हॉस्पिटलची चेन सुरू करायची आहे.
बजाज ग्रुपची स्थापना ९८ वर्षांपूर्वी जमनालाल बजाज यांनी केली होती. कंपनीचे मूल्यांकन जवळपास १.४६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. २०२२ मध्ये कंपनीचे राहुल बजाज यांच्या निधनानंतर बजाजचे हे पहिले डायव्हर्सिफिकेशन आहे. सध्या ही योजना प्राथमिक अवस्थेत आहे. रिपोर्टनुसार, हेल्थकेअर व्यवसायासाठी कंपनीकडून एक नवीन ग्रुप स्थापन करण्यात येणार आहे. बजाज ग्रुप कंपनी मुकंद लिमिटेडमधील कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे प्रमुख नीरव बजाज कंपनीच्या आरोग्य सेवा व्यवसायाची देखरेख करू शकतात. नीरव हे मुकंदचे अध्यक्ष आणि एमडी नीरज बजाज यांचे पुत्र आहेत.
दरम्यान, हेल्थकेअर व्यवसाय योजना अद्याप निश्चित होणे बाकी आहे. कंपनी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करेल, असे म्हटले जाते. रिपोर्टमध्ये सूत्रांचा हवाला देत, कंपनीने नवीन व्यवसायासाठी मुंबईतील लोअर परेल येथे कार्यालयही सुरू केले आहे. बजाज ग्रुपच्या आधीच अनेक कंपन्या आहेत. ज्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स, फायनान्स, ऑटोमोबाईल यांचा समावेश आहे. यामध्ये बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्स, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, मुकंद इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स आणि हर्क्युलस होइस्ट या कंपन्यांचा समावेश आहे.