Join us

मंदीसदृश्य वातावरणातही यंदा सरासरी ९.१ टक्के वेतनवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 3:18 AM

समाधानाची बाब : मोठ्या देशांच्या तुलनेत भारतात अधिक वाढ

नवी दिल्ली : भारतात गेले वर्षभर मंदीचे सावट असले आणि त्याचा प्रभाव अद्याप जाणवत असला तरीही या वर्षात नोकरदारांना सुमारे ९.१ टक्के पगारवाढ मिळेल, अशी शक्यता आहे. आशियातील चीन, तैवान, जपान, दक्षिण कोरिया आदी देशांच्या तुलनेत भारतातील पगारवाढ सर्वाधिक असेल असे दिसत आहे. एआॅन या मानव संसाधन क्षेत्रातील कंपनीच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मंदीच्या पार्श्वभूमीवर ९.१ टक्के पगारवाढ मिळणे ही समाधानाची बाब असली तरी गेल्या १0 वर्षांतील ही सर्वात कमी वाढ असेल. मंदीच्या वातावरणातही भारतीय कंपन्या कौशल्याला प्राधान्य देण्यासाठी ९.१ टक्के पगारवाढ देतील, असे एआॅन कंपनीने अहवालात नमूद केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाही पगारवाढ केवळ 0.२ टक्क्यांनी कमी असेल. गेल्या वर्षी भारतात सरासरी ९.३ टक्के वेतनवाढ देण्यात आली होती. भारतातील ३९ टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना १0 टक्के, तर ४२ टक्के कंपन्या ८ ते २0 टक्के पगारवाढ देतील, असा अंदाज आहे. देशाच्या २0 क्षेत्रांमधील एक हजारांहून अधिक कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ई-कॉमर्स व सेवा तसेच व्यावसायिक क्षेत्रांतील कंपन्या १0 टक्के वा त्याहून काहीशी अधिक पगारवाढ देतील, असे दिसते. औषध कंपन्यांबरोबरच केमिकल कंपन्या व एफएमसीजीमध्ये यंदा चांगली पगारवाढ मिळू शकेल.एआॅनच्या झीटेल फर्नांडिस यांनी सांगितले की, २0१९ मध्ये भारतीय कंपन्या व उद्योगांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. तरीही यंदा कर्मचाऱ्यांना मिळणारी पगारवाढ समाधानकारक दिसत आहे. आशियातील महत्त्वाच्या देशांच्या तुलनेत भारत पगारवाढीबाबत यंदा पहिल्या स्थानावर असेल.भारताखालोखाल चीनचा क्रमांक आहे. मात्र कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे त्यात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 

टॅग्स :व्यवसायनोकरीअर्थव्यवस्था