ॲड. डॉ. प्रशांत माळी
सायबर कायदा व सायबर सुरक्षातज्ज्ञ
इंटरनेटने आपल्या खरेदी करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती केली आहे. ऑनलाइन शॉपिंग म्हणजेच इंटरनेटवरून उत्पादने किंवा सेवा घरबसल्या खरेदी करणे, हा ई-कॉमर्सचा भाग आहे. धकाधकीच्या आयुष्यात लोकांना प्रत्यक्षात दुकानांमध्ये न जाताना ऑनलाइन खरेदी करणे हे खूप सोयीस्कर झाले आहे. मात्र, यात फसवणूक होण्याचा धोका अंमळ जास्त असतो...
सध्या उत्सवाच्या या हंगामात खरेदीचे प्रमाण वाढताना दिसते. जवळपास सगळ्या ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाइटवर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिले जाते व त्याचा प्रभाव असा पडतो की तुमचे शॉपिंग करण्याचे प्रमाणही वाढते. लहान शहरांत जिथे नवीन फॅशन ट्रेंड उपलब्ध नसतील, तिथे आवडत्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी करू केली जाते.
ऑनलाइन खरेदी करताना खूप लोकांची फसवणूक झाल्याचेही आपण ऐकले असेल, खूप स्वस्त वस्तू देण्याचे आमिष दाखवून तुम्हाला फसवले जाते. काही वेळा तुम्ही चुकीच्या पद्धतीने ऑनलाइन शॉपिंग करायला जाता आणि तुमच्या बँकेतील, तुमच्या क्रेडिट कार्डमधील पैसे जातात. परंतु खबरदारी बाळगून ऑनलाइन शॉपिंगचा आनंद घेता येऊ शकतो. ऑनलाइन खरेदी करताना महत्त्वाच्या अशा पुढील गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक असते.
ऑनलाइन खरेदी करताना वेबसाइटची पडताळणी करून तिची विश्वासार्हता तपासून मगच खरेदी करा. एचटीटीपीएसने सुरुवात असलेल्या वेबसाइटवरूनच खरेदी करावी.
सोशल मीडियावरती शॉपिंगच्या लिंक्स येतात त्यावर खरेदी करणे टाळावे.
शॉपिंग करणाऱ्या वेबसाइटवर जर पासवर्ड असेल तर तो strong ठेवावा जेणेकरून तुमची वैयक्तिक माहिती लिक होणार नाही.
ई-मेलद्वारे येणाऱ्या जाहिराती लिंक्सवरून शॉपिंग करू नका, हा खूप मोठा ई-मेल स्कॅम होऊ शकतो.
ऑनलाइन खरेदी करताना वस्तूसंदर्भातील माहिती व्यवस्थित वाचा मगच खरेदी करा, शक्य तेथे “कॅश ऑन डिलिव्हरी”ची निवड करा.
ऑनलाइन शॉपिंगचे ॲप डाउनलोड करताना ॲपची नीट सत्यता तपासून मगच ॲप डाउनलोड करा.
ऑनलाइन शॉपिंगसाठी मोफत मिळत असलेल्या वायफायचा वापर टाळावा, कारण त्यात तुमचा वैयक्तिक डेटा चोरी होण्याची शक्यता असते.
अविश्वसनीय अशा कमी किमतीत वस्तू ऑफर करणाऱ्या वेबसाइट दोनदा तपासा, कारण त्या तुमची क्रेडिट/डेबिट कार्डची माहिती गोळा करण्यासाठीचा एक मार्ग असू शकतो.
वेबसाइट जर व्यावसायिक दिसत नसेल, त्यात बरेच पॉप-अप, खराब व्याकरण, अस्पष्ट वर्णन आणि चुकीचे वर्तन असेल, तर वेबसाइट कदाचित वैध नसेल त्यावर खरेदी करणे टाळावे.
जर तुम्हाला कोणत्याही वेबसाइटसंबंधित शंका असेल तर त्या वेबसाइटचे नाव तुमच्या शोध इंजिनमध्ये टाका आणि लिंकवर क्लिक करण्याऐवजी थेट साइटवर जा, जेणेकरून कोणी त्याबद्दल तक्रार केली आहे का ते तुम्हाला कळेल.
फसवणूक झाल्यास?
तुम्ही कधी ऑनलाइन शॉपिंगच्या फसवणुकीत अडकलात वा आपल्या जवळच्या व्यक्तीची फसवणूक झाली तर त्याविरोधात आपण कुठे तक्रार करावी हे माहीत नसते. अशा प्रकारच्या फसवणुकीविरोधात तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागू शकता. आपण ग्राहक कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता, त्याव्यतिरिक्त, जर आपणास फोनवरच तक्रार करायची असेल तर आपण अधिकृत टोल फ्री क्रमांक १८००-११-४००० वर कॉल करूनदेखील आपली तक्रार नोंदवू शकता, तसेच १४४०४ या क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता.