Join us

अलर्ट! Credit Card चा वापर करता? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात नाहीतर होईल मोठं नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 11:50 AM

Credit Card : ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अनेक ठिकाणी विशिष्ट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी विशेष सवलत आहे.

नवी दिल्ली - सध्या ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अनेक ठिकाणी विशिष्ट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी विशेष सवलत आहे. पण डिस्काऊंटच्या नादत अनेक वेळा आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतो. मात्र ही खरेदी महागात पडू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला असा कोणताही त्रास टाळायचा असेल तर क्रेडिट कार्डचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने खरेदी करता, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की, तुम्ही फक्त तुम्हाला परवडेल तितकेच सामान अथवा वस्तू खरेदी करा. अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका ज्यामुळे तुम्हाला किमान शिल्लक पेमेंटसह काम करावे लागेल आणि त्याऐवजी व्याज म्हणून मोठी रक्कम द्यावी लागेल. किमान देय रक्कम थकबाकीच्या 5 टक्के आहे. मात्र, यात ईएमआय समाविष्ट नाही. किमान रक्कम भरल्यास कोणताही दंड आकारला जात नाही, तरी व्याज भरावे लागते.

महागड्या वस्तूंची खरेदी करणं टाळा

कोरोना संकटातून अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. अशा परिस्थितीत हा सणासुदीचा हंगाम बाजारासाठी उत्तम असेल असा विश्वास आहे. मागणीत बंपर वाढ अपेक्षित आहे. तरीही अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळा. लक्षात ठेवा की तुम्हाला एखादी वस्तू तातडीने हवी नसल्यास त्याची खरेदी पुढे ढकलावी.

पैसे काढू नका 

आपल्याला क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा देखील मिळते. मात्र, त्यासाठी प्रचंड व्याज द्यावे लागते. त्यामुळे अगदीच अडचणीचा प्रसंग आल्याशिवाय क्रेडिट कार्डमधून पैसे काढू नका. रोख रक्कम काढण्यासाठी अनेक प्रकारचे शुल्क आहेत आणि व्याज दर देखील खूप जास्त आहे.

रिवॉर्डस पॉईंटसचा योग्य वापर करा

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च करता, तेव्हा तुम्हाला मोबदल्यात रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. मात्र, त्याची एक्स्पायरीही असते. अशा परिस्थितीत, क्रेडिट कार्डमधून मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंटवर लक्ष ठेवा आणि वेळोवेळी त्याचा वापर करत राहा.

सिबिल स्कोअर चांगला करण्याच्या मागे धावू नका

क्रेडिट वापर गुणोत्तराकडे देखील लक्ष द्या. पैसा बाजारचे साहिल अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी कधीकधी कार्डधारक जास्त खर्च करतात. जर क्रेडिट वापर गुणोत्तर 30 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर क्रेडिट ब्युरो त्यावर विशेष लक्ष ठेवतात आणि CIBIL स्कोअर देखील कमी करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :बँकपैसाऑनलाइन