Join us

राज्यातील ९ सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान

By admin | Published: September 21, 2016 5:08 AM

महाराष्ट्रातील ९ सहकारी साखर कारखान्यांना नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप शुगर इंडस्ट्रीजच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- साखर उत्पादन क्षेत्राच्या विविध श्रेणीत विशेष गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ सहकारी साखर कारखान्यांना नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप शुगर इंडस्ट्रीजच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. सर्वोत्तम कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा सन्मान यंदा कोल्हापुर जिल्ह्यातील यलगुडच्या जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याला प्राप्त झाला आहे.दिल्लीच्या को-आॅपरेटिव्ह युनियन आॅफ इंडियाच्या सभागृहात आयोजित नॅशनल शुगर फेडरेशनच्या ५७ व्या वार्षिक सभेत, फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपाध्यक्ष अमित कोरे, व्यवस्थापकीय संचालक एम.जी. जोशी व अन्य मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. गुणवत्तेच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी देशातल्या ९0 साखर कारखान्यांनी विविध श्रेणीत आपल्या प्रवेशिका सादर केल्या होत्या. त्यापैकी २१ कारखान्यांची पुरस्कारासाठी निवड झाली. महाराष्ट्रातल्या ९ सहकारी साखर कारखान्यांचा त्यात समावेश आहे. सर्वोत्तम कामगिरी दिला जाणारा पुरस्कार जवाहर शेतकरी साखर कारखाना (यलगुड कोल्हापुर)चे अध्यक्ष कल्लप्पा आवाडेंसह कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला. देशात उच्च दर्जाच्या साखर उत्पादनासाठी सांगलीच्या पलुस तालुक्यातील डॉ. जी.बी.बापू लाड सहकारी कारखान्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी पदाधिकाऱ्यासह तो स्वीकारला.देशात ऊ स विकास कार्यक्रमात सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रदान करण्यात येणारे दोन्ही पुरस्कार यंदा महाराष्ट्राने पटकावले असून पहिला क्रमांक कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यातील श्री दत्त सहकारी कारखान्याला तर दुसरा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या पारगांवच्या भिमाशंकर सहकारी कारखान्याला देण्यात आला. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील व भिमाशंकर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत ढगेंनी आपल्या सहकाऱ्यांसह हे पुरस्कार स्वीकारले.साखर निर्यात क्षेत्रात उत्तम कामगिरीसाठी दिले जाणारे दोन्ही पुरस्कारही महाराष्ट्रातल्या कारखान्यांनीच पटकावले आहेत. पहिला पुरस्कार सोलापूरच्या माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याला, तर दुसरा पुरस्कार कोल्हापूरच्या कागल येथील छत्रपती शाहु कारखान्याला देण्यात आला. या दोन्ही कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक अनुक्रमे आर,एस.धनवडे व विजय औताडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हे पुरस्कार स्वीकारले.विशेष पुरस्कार ‘समर्थ’लातांत्रिक कार्यक्षमता श्रेणीतला दुसरा पुरस्कार सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील शिरपूरच्या पांडुरंग सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी तर आर्थिक क्षेत्रात उत्तम व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार जालन्याच्या अंबड तालुक्यातील समर्थ सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव पावसेंनी सहकारी पदाधिकाऱ्यांसह स्वीकारला. >देशात सर्वाधिक साखर उताऱ्यासाठी दिला जाणारा पुरस्कार सांगलीच्या वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर सहकारी कारखान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडींनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांसह तो स्वीकारला.