मुंबई : खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अॅक्सिस बँकेने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेच्या ग्राहकांना वेळेआधी मुदत ठेव बंद केल्यास त्यावर आता कोणताही दंड आकारला जाणार नाही, अशी घोषणा बँकेकडून करण्यात आली. अॅक्सिस बँकेने घेतलेला निर्णय ग्राहकांना मोठा दिलासादायक असल्याचे सांगितले जात आहे.
१५ डिसेंबर २०२० आणि त्यानंतर ठेवण्यात आलेल्या सर्व रिटेल मुदत ठेवी वेळेआधी बंद केल्यास त्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. तसेच अॅक्सिस बँकेकडून देण्यात आलेली ही नवीन सुविधा सर्व नव्या मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींवरही लागू करण्यात येणार आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी ठेवलेल्या मुदत ठेवींसाठी अकाली दंड आकारला जाणार नाही, असेही बँकेकडून सांगण्यात आले.
अॅक्सिस बँकेचे ईव्हीपी-रिटेल लायबिलिटी आणि डायरेक्ट बँकिंग प्रॉडक्ट्स अधिकारी प्रवीण भट्ट यांनी सांगितले की, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक कार्यरत आहे. त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे १५ महिन्यांनंतर बंद केलेल्या सर्व मुदत ठेवीवरील दंड माफ करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक ही भारतातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. सात दिवसांपासून ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर बँकेकडून सर्वसामान्य ग्राहकांना २.५ टक्के ते ५.५० टक्के व्याज देण्यात येते. तर ज्येष्ठ नागरिकांना याच मुदत ठेवींवर २.५ टक्के ते ६.०५ टक्के व्याज बँकेकडून देण्यात येते.