जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न कोटींमध्ये आहे असं सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण अशीच एक व्यक्ती आहे ज्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वेतन तब्बल 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक होतं. 2022-23 या आर्थिक वर्षात अॅक्सिस बँकेचे (Axis Bank) एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचं वार्षिक वेतन पॅकेज 9.75 कोटी रुपये होतं. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, चौधरी यांच्या पॅकेजमध्ये 4.4 कोटी रुपयांचे मूळ वेतन, 1.4 कोटी रुपयांच्या सुविधा आणि मागील वर्षांतील व्हेरिएबल पे चा समावेश आहे.
गेल्या तीन आर्थिक वर्षांत चौधरी यांचं वार्षिक वेतन 7.62 कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षात, अॅक्सिस बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक राजीव आनंद यांना 2.9 कोटी रुपयांच्या मूळ वेतनासह 6.4 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळालं. याशिवाय 34.3 लाखांच्या अतिरिक्त सुविधा आणि व्हेरिएबल पे चा यात समावेश करण्यात आला होता.
अतिरिक्त सुविधांमध्ये घर, वीज, पाणी, फर्निचर, क्लब फी, वैयक्तिक अपघात विमा, लोन, कार आणि फोन, मेडिकल रिअंबर्समेंट, प्रवास आणि निवास भत्ता यांचा समावेश होता. अॅक्सिस बँकेच्या मते, आनंद आणि चौधरी दोघांनाही आर्थिक वर्ष 2022 साठी 369,014 आणि 248,783 स्टॉक ऑप्शन देण्यात आले होते. जे आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI)मंजुरीच्या अधीन आहे. स्टॉक ऑप्शन्सला प्रति शेअर 725.90 रुपये मंजूर करण्यात आलेत.
एचडीएफसी आणि स्टेट बँकेत किती वेतन
त्या तुलनेत, एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ शशिधर जगदीशन यांना 2022-24 या आर्थिक वर्षात वार्षिक पॅकेज म्हणून 10.5 कोटी रुपये मिळाले. एचडीएफसी बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये जगदीशन यांचा पगार 6.51 कोटी रुपये होता.
जगदीशन यांच्या पॅकेजमध्ये 2.82 कोटी रुपयांचे मूळ वेतन, 3.3 कोटी रुपयांचे भत्ते आणि सुविधा, तसंच 3.63 कोटी रुपयांचा परफॉर्मन्स बोनस यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, एचडीएफसी बँकेचे कार्यकारी संचालक कैझाद भरुचा यांचम वार्षिक पॅकेज 10 कोटी रुपये होतं, ज्यात 2.7 कोटींचं मूळ वेतन, 4.3 कोटी रुपयांचे भत्ते आणि इतर सुविधा, तसंच 2.2 कोटींचा बोनस यांचा समावेश होता.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) अध्यक्ष दिनेश खारा यांना 2022-23 या आर्थिक वर्षात 37 लाख रुपयांचा पगार मिळाला, जो गेल्या वर्षीच्या पगारापेक्षा 7.5 टक्क्यांनी अधिक आहे. स्टेट बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, खारा यांचं मूळ वेतन 27 लाख रुपये होतं. तर त्यांना 9.99 लाख रुपये महागाई भत्ता मिळाला होता. मागील आर्थिक वर्षात खरा यांचं वेतन 34.42 लाख रुपये होते.
सरकारी आणि खासगी बँकांच्या सर्वोच्च बँकर्सच्या पगारातील तफावतीबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. सामान्यत: खाजगी बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील त्यांच्या समकक्षांपेक्षा अधिक पगार मिळतो.