Join us

Axis-Citi Bank Deal: बँकिंग क्षेत्रातील मोठा व्यवहार; अ‍ॅक्सिसकडून सिटी बँकेची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 3:02 PM

Axis-Citi bank takeover: अ‍ॅक्सिस बँकेने शेअर बाजाराला या व्यवहाराची माहिती दिली. बँकेने सांगितले की, या व्यवहाराला नियामकीय मंजुऱ्या मिळणे बाकी आहे.

खासगी क्षेत्रातील बँक अ‍ॅक्सिसने अमेरिकेची कंपनी सिटी ग्रुपचा भारतातील व्यवसाय ताब्यात घेतला आहे. बुधवारी 12,325 कोटी रुपयांना ही मोठी डील झाली. याबरोबर सीटी बँकेचा क्रेडिट कार्ड बिझनेस, रिटेल बँकिंग, वेल्थ मॅनेजमेंट आणि कंझ्युमर लोन्स बिझनेस अ‍ॅक्सिसच्या ताब्यात आला आहे. या डीलनंतरही सिटी बँकेचे क्रेडिट कार्डचे ग्राहक रिवॉर्ड पॉईंट आणि अन्य सुविधा घेऊ शकणार आहेत. 

अ‍ॅक्सिस बँकेने शेअर बाजाराला या व्यवहाराची माहिती दिली. बँकेने सांगितले की, या व्यवहाराला नियामकीय मंजुऱ्या मिळणे बाकी आहे. बँकेला पुढील 9 ते 12 महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या करारामध्ये सिटीकॉर्प फायनान्स इंडिया लिमिटेड, सिटीची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) च्या ग्राहक व्यवसायाचाही समावेश आहे.

पर्सनल लोन पोर्टफोलिओ व्यतिरिक्त, या व्यवसायात सिक्युरिटीवर कर्ज, व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज आणि बांधकाम वस्तूंसाठी कर्ज समाविष्ट आहे. या करारामुळे अ‍ॅक्सिस बँकेचा ताळेबंद तर वाढेलच, पण रिटेल बँकिंगमध्येही तिचा वाटा देखील वाढणार आहे. 

सिटी बँक 1902 पासून भारतात आहे आणि 1985 पासून ग्राहक बँकिंग व्यवसायात कार्यरत आहे. सिटी बँकेच्या भारतात 35 शाखा आहेत आणि सुमारे 4,000 कर्मचारी ग्राहक बँकिंग व्यवसायात कार्यरत आहेत. करार पूर्ण झाल्यानंतर, हे सर्व अ‍ॅक्सिस बँकेचे भाग बनतील. याशिवाय सिटी बँक इंडियाचे सुमारे ३० लाख ग्राहकही अ‍ॅक्सिस बँकेत विलीन होतील. या करारानंतर अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्ड ग्राहकांची संख्या सुमारे 31 टक्क्यांनी वाढेल.

सिटी बँक भारतात इंस्टीट्यूशनल बँकिंग व्यवसाय आणि ग्लोबल बिझनेस सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून काम करत राहणार आहे. सिटी बँकेची मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम येथे ग्लोबल बिझनेस सपोर्ट सेंटर्स आहेत.

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र