Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी रोजी श्री रामजन्मभूमी येथे राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशातील श्रद्धा आणि अध्यात्माचं शहर म्हणून ओळखलं जाणारं उत्तर प्रदेशातील अयोध्या हे झपाट्यानं जागतिक गुंतवणुकीचं ठिकाण बनत आहे. येत्या काळात येथील रहिवाशांनाही मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अयोध्येतील भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन ब्रिटीश समूह ट्रॅफलगर स्क्वेअर कॅपिटलने (Trafalgar Square Capital) अयोध्येत ७५,००० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे.
ही मोठी गुंतवणूक अयोध्येत अत्याधुनिक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी करण्यात आली आहे. भारतातील एकाच जिल्ह्यात आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. ट्रॅफलगर स्क्वेअर कॅपिटल आणि स्थानिक प्राधिकरण यांच्यात ५ सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले आहेत. या करारांमुळे अयोध्येचं औद्योगिक विकासाचं जागतिक ठिकाण म्हणून स्थान मजबूत झालंय.
ट्रफलगर स्क्वेअर कॅपिटलने ही एक आघाडीच्या मल्टीनॅशनल कंपन्यांपैकी एक आहे जी थेट विदेशी गुंतवणूक (FDI) धोरणांतर्गत उत्तर प्रदेशमध्ये स्वारस्य दाखवत आहे. या यादीत हाँगकाँगस्थित तौशन इंटरनॅशनल ग्रुप, आरजी ग्रुप, ऑस्टिन कन्सल्टिंग ग्रुप, कोसिस ग्रुप, इंडो युरोपियन चेंबर ऑफ स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेस, एबीसी क्लीनटेक आणि जर्मनीची युनिकॉर्न एनर्जी यांचाही समावेश आहे.
आर्थिक दृष्ट्या मोठा परिणाम
ट्रॅफलगर स्क्वेअर कॅपिटलच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी अयोध्येची निवड केल्यानं या प्रदेशाच्या आर्थिक बाबींवर खोलवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सची स्थापना करण्यासाठी ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अयोध्येच्या औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे. “ट्रॅफलगर स्क्वेअर कॅपिटलची ही मोठी गुंतवणूक अयोध्या आणि संपूर्ण राज्यासाठी गेम चेंजर आहे. हे उत्तर प्रदेशच्या व्यवसाय-अनुकूल धोरणांवर आणि औद्योगिक विकासासाठी धोरणात्मक दृष्टिकोनावरील गुंतवणूकदारांचा विश्वास प्रतिबिंबित करते," अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे उद्योग मंत्री नंद गोपाल नंदी यांनी दिली.