नवी दिल्ली - विप्रो कंपनीचे सॉफ्टवेअर एक्सपोर्टर अजीम प्रेमजी यांनी आर्थिक वर्षे 2021 मध्ये एकूण 9713 कोटी रुपये म्हणजेच प्रति दिन 27 कोटी रुपये दान केले आहेत. दान देण्याच्या बाबतीत अजीम प्रेमजी आजही रँकींगमध्ये टॉपला आहेत. विप्रो कंपनीच्या सुप्रिमोंनी कोविड महामारीच्या संकट काळात आपल्या दान देण्याच्या रकमेत जवळपास 1/4 वाढ केली आहे. Edelgive Hurun India Philanthropy List 2021 अनुसार अजीम प्रेमजी पहिल्या क्रमांकावर आहेत.
सर्वाधिक दान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या यादीत एचसीएल कंपनीचे शिव नादर हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी एकूण 1263 कोटी रुपयांचं योग'दान' दिलं आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी यांनी 577 कोटी रुपयांचे दान केले आहे. तर, कुमार मंगलम बिर्ला यांनी 377 कोटी रुपयांचे दान केले असून ते चौथ्या स्थानावर आहेत. गौतम अदानी यांनी आपत्ती फंडासाठी 130 कोटी रुपयांचा निधी दिला असून दानशूर व्यक्तींच्या यादीत ते आठव्या स्थानावर आहेत.
इंफोसेसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी यांच्या रँकींगमध्ये सुधारणा झाली असून 183 कोटी रुपयांचे दान त्यांनी केले आहे. नीलकेणी यांनी सामाजिक विचार यांना प्राधान्य देत हे दान केले आहे. Hurun India चे मॅनेजींग डायरेक्टर आणि चीफ रिसर्चर अनास रहमान जुनैद यांनी म्हटले की, सद्यस्थितीत सर्वाधिक पैसा शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर खर्च होत आहे.