B20 Summit India: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी(दि.27) नवी दिल्लीत आयोजित बी-20 शिखर परिषदेला संबोधित करत आहेत. या कार्यक्रमात जगभरातील सुमारे 17000 व्यापारी सहभागी झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक प्रतिभावान तरुण आहेत. आज भारत इंडस्ट्री 4.0 च्या युगात डिजिटल क्रांतीचा चेहरा बनला आहे. भारतासोबतची तुमची मैत्री जितकी घट्ट होईल तितका दोघांनाही अधिक फायदा मिळेल.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, मला आनंद आहे की, जी-20 देशांमध्ये बिझनेस-20 हा एक चांगला मंच म्हणून उदयास आला आहे. यावेळी 23 ऑगस्टपासूनच सणांची सुरुवात झाली आहे. चंद्रयान-3 चंद्रावर पोहोचल्याचा उत्सव खूप मोठा आहे. चंद्र मोहीम चंद्रावर पोहोचण्यात इस्रोने मोठी भूमिका बजावलीच, परंतु यात भारताच्या उद्योगाचेही मोठे योगदान आहे.
'भारत विश्वासाचा झेंडा घेऊन उभा आहे'कोरोना महामारीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, दोन-तीन वर्षांपूर्वी आपण जगातील सर्वात मोठ्या साथीच्या संकटातून गेलो आहोत. या संकटाने जगातील प्रत्येक देशाला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक व्यवसायाला, प्रत्येक व्यावसायिक घटकाला एक धडा दिला, तो म्हणजे परस्पर विश्वासाचा. कोरोनाने परस्पर विश्वास नष्ट केला, या अविश्वासाच्या वातावरणात जो देश आपल्यासमोर पूर्ण संवेदनशीलतेने आणि नम्रतेने विश्वासाचा झेंडा घेऊन उभा आहे, तो म्हणजे भारत आहे.
मोदी पुढे म्हणतात, "उत्पादक आणि ग्राहक यांच्या हितसंबंधांमध्ये समतोल असेल, तेव्हाच फायदेशीर बाजारपेठ टिकू शकते. इतर देशांना केवळ बाजारपेठ म्हणून वागवणे योग्य नाही. ते उशिरा का होईना, उत्पादक देशांचे नुकसान करेल. प्रत्येकाला प्रगतीत समान भागीदार बनवणे आवश्यक आहे. व्यवसाय अधिक ग्राहक केंद्रित कसा करता येईल, याचा आपण सर्वजण अधिक विचार करायला हवा, असंही मोदी म्हणाले. PMO कडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, Business 20 (B20) हे G-20 तील जागतिक व्यापारी समुदायासोबतचा अधिकृत संवाद मंच आहे. याची स्थापना 2010 मध्ये झाली होती.