Join us

Baba Ramdev: “रुचि सोया कंपनी एप्रिलपर्यंत ३३०० कोटींच्या कर्जातून मुक्त होईल”: बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 4:25 PM

पतंजली ग्रुपच्या आणखी काही कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्याचा मेगा प्लान बाबा रामदेव यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: योगगुरू बाबा रामदेव यांनी रुची सोया इंडस्ट्रीजचा (Ruchi Soya) FPO आणण्याची घोषणा केली आहे. रुची सोया ही आता केवळ कमॉडिटी कंपनी राहिलेली नाही. तिच्याकडे आता FMCG, फूड बिझनेस आणि न्यूट्रास्युटिकल्ससह इतर व्हर्टिकल आहेत. रुची सोयाचा FPO २४ मार्च ते २८ मार्चपर्यंत सबस्क्राइब करता येणार आहे. यातच आता योगगुरू बाबा रामदेव यांनी एक मोठा दावा केला आहे. रुचि सोया कंपनीवर असलेले कर्ज एप्रिल महिन्यापर्यंत संपेल, असे बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी म्हटले आहे. 

आताच्या घडीला रुची सोया कंपनी दररोज अनेक कोटींचे व्याज कर्जापोटी भरत असल्याचे सांगितले जात आहे. न्यूट्रेलासारख्या ब्रँडची मालकी असलेल्या रुची सोया कंपनीवर सध्या ३ हजार ३०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना योगगुरू बाबा रामदेव यांनी एप्रिलपर्यंत सर्व कर्ज फिटेल, असा दावा केला आहे. रुचि सोयाचे अधिग्रहण आणि शेअर बाजारात पुन्हा लिस्ट करण्यात यश मिळाल्यानंतर पतंजली ग्रुपचे व्यवस्थापन मंडळ आणखी काही कंपन्या शेअर बाजारात लिस्टेट करण्याच्या विचार असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. 

FPO च्या माध्यमातून कंपनी ४,३०० कोटी रुपये उभारणार 

SBI कॅपिटल मार्केट्स, एक्सिस कॅपिटल आणि ICICI सिक्युरिटीज हे रुचि सोया इश्यूचे व्यवस्थापन करणारे गुंतवणूक बँकर आहेत. या FPO च्या माध्यमातून कंपनी ४,३०० कोटी रुपये उभारणार आहे. रुची सोयाने FPO साठी प्रतिशेअर ६१५-६५० रुपयांचा प्राईज बँड सेट केला आहे. कंपनीने शेअर मार्केटला सांगितले आहे की, कंपनीच्या इश्यू कमिटीने FPO साठी प्रतिशेअर ६१५ रुपये फ्लोअर प्राईस आणि प्रतिशेअर ६५० रुपये कॅप किंमत मंजूर केली आहे. तर, स्टॉक फायलिंगमध्ये, कंपनीने म्हटलंय की, FPO साठी कमीतकमी लॉट आकार २१ शेअर्सचा आहे. 

दरम्यान, FPO चे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला किमान २१ शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. तुम्हाला रुची सोया या ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान १३,६५० रुपये गुंतवावे लागतील. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने २०१९ मध्ये रुची सोया ही कंपनी विकत घेतली होती. कंपनीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एफपीओ आणण्यासाठी बाजार नियामक सेबीची परवानगी मिळाली होती. 

टॅग्स :रामदेव बाबाशेअर बाजारपतंजली