Join us  

बाबा रामदेव पुन्हा अडचणीत, दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा! न्यायालयानं बजावली नोटिस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 4:45 PM

न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून केंद्र सरकार, पतंजली, पतंजलीचे दिव्य फार्मेसी, बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आदींना नोटीसही बजावून उत्तर मागवले आहे. 

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचे उत्पादन असलेल्या दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून केंद्र सरकार, पतंजली, पतंजलीचे दिव्य फार्मेसी, बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आदींना नोटीसही बजावून उत्तर मागवले आहे. 

संबंधित याचिकेत म्हणण्यात आले आहे की, दिव्या दंत मंजन हे शाकाहारी असल्याचे सांगत बाजारात विकले जाते. मात्र त्यात माशांच्या घटकांचा समावेश आहे. अधिवक्ता यतीन शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. यात, कंपनी आपल्या 'दिव्य दंत मंजन'मध्ये 'समुद्र फेन' (कटलफिश) नामक मांसाहारी पदार्थ वापरते, असे म्हणण्यात आले आहे.

याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, त्यांनी यासंदर्भात दिल्ली पोलीस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, FSSAI, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि आयुष मंत्रालयाकडे अनेकदा तक्रार केली. मात्र, कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. यामुळे त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

प्रोडक्टवर हिरव्या रंगाच्या डॉटचा वापर -याचिकेत म्हणण्यात आले आहे की, मंजनमध्ये मांसाहारी घटक असूनही कंपनी हिरवा डॉट लावून त्याची विक्री करते. हिरवा डॉट सूचित करतो की, संबंधित उत्पादनात केवळ शाकाहारी घटकच वापरण्यात आले आहेत.

बाबा रामदेव यांनी स्वतः स्वीकारलंय -याचिकाकर्ते यतीन शर्मा आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक दिवसांपासून, हे मंजन पूर्णपणे शाकाहारी असल्याचे समजून वापरत होते. यतीन यांनी दावा केला आहे की, "बाबा रामदेव यांनी स्वत:च, त्यांच्या या उत्पादनात 'सी फोम'चा वापर केला जातो असे एका व्हिडिओमध्ये कबूल केले होते. असे असूनही कंपनी चुकीच्या पद्धतीने आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग करत आहे आणि मंजन शाकाहारी असल्याचे सांगत आहे." तसेच, कंपनीने या मंजनमध्ये मांसाहारी घटक वापरून आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोपही शर्मा यांनी केला आहे.

टॅग्स :रामदेव बाबापतंजलीन्यायालय