बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने (Patanjali Ayurved Limited) १४ उत्पादनांची विक्री बंद केली आहे. कंपनीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील माहिती दिली. उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणानं एप्रिलमध्ये ज्या १४ उत्पादनांचे उत्पादन परवाने निलंबित केले होते, त्यांची विक्री थांबवली असल्याचं कंपनीनं न्यायालयाला म्हटलं. कंपनीनं ५,६०६ फ्रँचायझी स्टोअर्सना ही उत्पादने मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मीडिया प्लॅटफॉर्म्सना या १४ उत्पादनांपैकी कोणत्याही स्वरूपातील जाहिराती मागे घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
खंडपीठाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. यामध्ये जाहिराती हटवण्यासाठी सोशल मीडिया मध्यस्थाकडे केलेली विनंती मान्य झाली आहे का आणि या १४ उत्पादनांच्या जाहिराती मागे घेण्यात आल्या आहेत का, हे कंपनीला सांगावं लागणार आहे. खंडपीठानं या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी ठेवली आहे. इंडिया मेडिकल असोसिएशननं (आयएमए) दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पतंजलीने कोविड लसीकरण मोहीम आणि आधुनिक वैद्यकीय पद्धतीची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परवाना रद्द
पतंजली आयुर्वेद आणि दिव्य फार्मसीच्या १४ उत्पादनांचे उत्पादन परवाने तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात दिली होती. योगगुरू बाबा रामदेव, त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी बजावण्यात आलेल्या अवमान नोटीसवर सर्वोच्च न्यायालयानं १४ मे रोजी निकाल राखून ठेवला होता.
कोणती उत्पादनं बंद?
१) श्वासरी गोल्ड - दिव्य फार्मसी
२) श्वासरी वटी - दिव्य फार्मसी
३) ब्रॉन्कॉम - दिव्य फार्मसी
४) श्वसन प्रवाह- दिव्य फार्मसी
५) श्वसन अवलेह- दिव्य फार्मसी
६) मुक्ता वटी एक्स्ट्रा पॉवर- दिव्य फार्मसी
७) लिपिडोम- दिव्य फार्मसी
८) बीपी ग्रिट- दिव्य फार्मसी
९) मधुग्रीट- दिव्य फार्मसी
१०) मधुनाशिनी वटी- दिव्य फार्मसी
११) लिव्हामृत अॅडव्हान्स- दिव्य फार्मसी
१२) लिव्होग्रिट- दिव्य फार्मसी
१३) पतंजली दृष्टी आय ड्रॉप- पतंजली आयुर्वेद
१४) आयग्रिट गोल्ड- दिव्य फार्मसी