नवी दिल्ली: योगगुरू बाबा रामदेव यांनी रुची सोया इंडस्ट्रीजचा (Ruchi Soya) FPO आणला आहे. रुची सोया कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होताच बाबा रामदेव (Baba Ramdev) यांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. पतंजली आयुर्वेदची रुची सोया कंपनी लिस्टेड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत कंपनीवरील तब्बल ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात आले असून, आता कंपनी कर्जमुक्त झाली आहे. गेल्याच महिन्यात बाबा रामदेव यांनी याबाबतीत सूतोवाच केले होते.
रुची सोया कंपनी दररोज अनेक कोटींचे व्याज कर्जापोटी भरत होती. न्यूट्रेलासारख्या ब्रँडची मालकी असलेल्या रुची सोया कंपनीवर ३ हजार ३०० कोटी रुपयांचे कर्ज होते. बाबा रामदेव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एप्रिलमध्ये रुची सोया कंपनीवरील सर्व कर्ज फिटलेले असेल, असा सांगितले होते. रुचि सोयाचे अधिग्रहण आणि शेअर बाजारात पुन्हा लिस्ट करण्यात यश मिळाल्यानंतर पतंजली ग्रुपचे व्यवस्थापन मंडळ आणखी काही कंपन्या शेअर बाजारात लिस्टेट करण्याच्या विचार असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले होते.
आचार्य बाळकृष्ण यांनी ट्विट करून दिली माहिती
रुची सोया कंपनीला एफपीओ माध्यमातून मिळालेले पैसे कर्ज फेडण्यासाठी उपयोगात आणले आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी ट्विट केले की, रुची सोया कर्जमुक्त झाली आहे. तसेच कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, एफपीओसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीने सुमारे १,९५० कोटी रुपयांचे कर्ज फेडणार असल्याचे सांगितले होते. तथापि, कंपनीने कर्जदारांना २,९२५ कोटी रुपयांची संपूर्ण कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, रुची सोया कंपनीच्या शेअरची किंमत ९२४.८५ रुपये होती. एका दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये १३ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. ज्या ग्राहकांना FPO वाटप प्रक्रियेद्वारे रुची सोयाचे शेअर्स मिळाले त्यांना ४० टक्क्यांहून अधिक प्रीमियम मिळाला आहे. FPO शेअर मार्केटमध्ये आला, तेव्हा त्याची किंमत ६५० रुपये निश्चित करण्यात आली होती.