नवी दिल्ली - रुची सोयाच्या FPO मध्ये गुंतवणुकीसाठी प्रेरित करणारा एक एसएमएस, कंपनीलाच महागात पडताना दिसत आहे. कारण मार्केट रेगुलेटर सेबीने, हा एसएमएस नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हणत योगगुरू बाबा रामदेव यांच्या या कंपनीवर कारवाई केली आहे. सेबीने गुंतवणूकदारांसाठी रुची सोयाच्या FPO (Follow on public Offer) मधून बाहेर पडण्याचा पर्याय खुला केला आणि यासाठी 30 मार्चपर्यंतचा वेळही देण्यात आला आहे.
अपेक्षेपेक्षा कमी होते सब्सक्रिप्शन -
आधीच अपेक्षेपेक्षा कमी सबस्क्रिप्शन आणि यातच सेबीच्या या आदेशामुळे रुची सोयाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. रुची सोयाचा FPO 28 मार्च रोजी बंद झाला होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी SEBI ने बाहेर पडण्यासंदर्भातील निर्देशही जारी केले होते. कंपनीचा FPO 3.6 पट सबस्क्राइब झाला होता. मात्र, आता सेबीच्या आदेशानंतर २९ मार्च रोजी गुंतवणूकदारांमध्ये पळापळ बघायला मिळाली आणि या एफपीओमधून बाहेर पडण्याची स्पर्धाच लागली.
ताज्या आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी कंपनीचे सब्सक्रिप्शन 3.6 पटवरून 2.28 पटवर आले आहे. यातून बाहेर पडण्याची शेवटची तारीख 30 मार्च आहे. तोवर आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अंतिम आकडे 30 मार्चलाच उपलब्ध होतील.
अर्ध्यावर कमी झाले रिटेल इन्व्हेस्टर्स -
सर्वाधिक धावपळ किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये बघायला मिळाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी बोल्या लावल्या होत्या आता ते यातून बाहेर पडत आहेत. आधीच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेली श्रेणी पूर्णपणे भरलेली नाही. या श्रेणीत केवळ 0.9 टक्केच सब्सक्रिप्शन मिळाले होते. आता हा आकडा 0.4 टक्क्यांवर आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 1.23 कोटी बोल्या मागे घेतल्या आहेत. संस्थात्मक गुंतवणूकदार अर्था क्वालीफाईड इंस्टिट्यूशनल बायर्स (QIB)चे सब्सक्रिप्शन 2.20 पट घसरून 1.6 पटवर आले आहे. या गुंतवणूकदारांकडून 4.95 कोटी बोल्या मागे घेण्यात आल्या आहेत.
रुचि सोयाही बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपचीच एक कंपनी आहे. हिच्या FPO ची इश्यू प्राइस 615-650 रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. रुची सोया ही देशातील सर्वात मोठ्या खाद्य तेल कंपन्यांपैकी एक आहे.