योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या मालकीच्या रुचि सोया (Ruchi Soya) कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजारात सोमवारच्या कामकाजाला सुरुवात होताच 'पतंजलि'नं अधिग्रहण केलेल्या रुचि सोया कंपनीच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं पाम तेलावरील आयात शुल्कात घट केल्यामुळे रुचि सोया कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आल्याचं सांगितलं जात आहे. रुचि सोया कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा मात्र यामुळे मोठा फायदा झाला आहे आणि जवळपास १ हजार कोटींचा गुंतवणुकदारांना फायदा झाला आहे.
सुखवार्ता! खाद्यतेलाच्या किमती कमी होणार, सरकारनं पामतेलावरील आयात शुल्कात केली मोठी कपात
खाद्य तेलाच्या वाढत्या दराला नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा एकदा आयात शुल्कात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आयात शुल्कात कपात केल्यामुळे देशातील जनतेला खाद्य तेलाच्या खरेदीत दिलासा मिळेल याच हेतूनं सरकारनं हे पाऊल टाकलं. सीपीओ, पामोलीन, सूरजमुखी, सोयाबीन डीगम आणि सोयाबीन रिफाइंड खाद्य तेलाच्या आयात शुल्कात सरकारनं ५.५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही कपात करण्यात आली आहे. याचा सामान्य ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
रुची सोया कंपनी भारतात खाद्यतेलाचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक महत्त्वाची कंपनी आहे. पाम तेलावरील आयात शुल्कात कपातीच्या निर्णयामुळे रुची सोया कंपनीच्या शेअर्समध्ये ३.५८ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. रुची सोया कंपनीच्या शेअरचा भाव १०८१.९० रुपयांवर पोहोचला आहे. याचा गुंतवणुकदारांना मोठा फायदा झाला आहे. शुक्रवारी कंपनीचा मार्केट कॅप ३०,९००.५९ कोटी रुपये इतका होता. आज त्यात वाढ होऊन तब्बल ३२,००७ कोटी रुपये इतका झाला आहे.
पामतेलाच्या व्यापाराकडे बाबा रामदेव यांचा मोर्चा वळालागेल्याच महिन्यात पामतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी भारत सरकारनं राष्ट्रीय खाद्य तेल-पाम तेल मिशनला (एनएमईओ-ओपी) मंजुरी दिली. या मिशनला मंजुरी मिळाल्यानंतर बाबा रामदेव यांनी आसाम, त्रिपुरा आणि इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये पाम तेलाच्या बागा सुरू करण्यासाठीची योजना हाती घेतली आहे.