Dabur India Project : डाबर इंडिया ही मोठी एफएमसीजी कंपनी आहे. कंपनी रोजच्या उपयोगातील वस्तूंची निर्मिती करते. आता ती दक्षिण भारतात आपला पहिला कारखाना उभारणार आहे. तामिळनाडूत हा नवा कारखाना उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला १३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. पुढील पाच वर्षांत ही गुंतवणूक ४०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे. या नवीन सुविधेमुळे डाबरला दक्षिण भारतात आपला व्यवसाय वाढविण्यास मदत होईल.
या ठिकाणाहून ती रेड टूथपेस्ट, ओडोनिल आणि हनी सारख्या आपल्या प्रसिद्ध ब्रँडची उत्पादनं तयार करणार आहे. या प्रकल्पासाठी डाबरनं गुरुवारी तामिळनाडू सरकारसोबत करार केला. डाबर आणि बाबा रामदेव यांची पतंजली हे थेट प्रतिस्पर्धी मानले जातात. डाबरच्या (Dabur Tamilnadu Plant) या पावलामुळे पतंजलीला विस्ताराच्या रणनीतीचा विचार करण्यास भाग पडणार असल्याचं म्हटलं जातंय.
डाबर भारतात १४ ठिकाणी कारखाने चालवते. परंतु, आतापर्यंत त्यांचा बहुतांश व्यवसाय उत्तर भारतातून होतो. गेल्या वर्षी डाबरनं मध्य प्रदेशात आपला सर्वात मोठा कारखाना सुरू केला होता. त्यात ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलीये
उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण होणार
या नवीन गुंतवणुकीमुळे डाबर दक्षिण भारतात आपल्या उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करू शकेल. यामुळे या भागात आपली पकड मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया डाबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा यांनी दिली. जून तिमाहीत डाबरचा एकत्रित निव्वळ नफा ८ टक्क्यांनी वाढून ५०० कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीचा महसूल ७ टक्क्यांनी वाढून ३,३४९ कोटींवर पोहोचलाय. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीचा महसूल १२,४०४ कोटी रुपये आणि निव्वळ नफा १,८४३ कोटी रुपये होता.