Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या पतंजलीसमोरील समस्या वाढल्या आहेत. पतंजली आयुर्वेद लिमिटेडला चार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. २०२३ च्या अंतरिम आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी कंपनीला दंड ठोठावला. मंगलम ऑर्गेनिक्स लिमिटेडनं दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या प्रकरणात पतंजलीला कापूर उत्पादनांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. न्यायमूर्ती आर.आय. छागला यांच्या खंडपीठानं पतंजलीनं न्यायालयाच्या आदेशाचं जाणीवपूर्वक उल्लंघन केलं आहे, असं म्हटलंय.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा पतंजलीचा हेतू होता, यात शंका नाही, असं खंडपीठानं म्हटलं. मंगलम ऑर्गेनिक्स लिमिटेडनं दाखल केलेली याचिका खंडपीठानं निकाली काढली. न्यायालयाने बंदी घातली असतानाही कापूर उत्पादनाची विक्री केल्याबद्दल पतंजलीवर अवमान कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.
दोन आठवड्यांत रक्कम द्यावी लागणार
न्यायमूर्ती छागला यांनी पतंजलीला दोन आठवड्यांत चार कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले. या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयानं कंपनीला ५० लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते.
पतंजलीवर आरोप काय?
मंगलम ऑर्गेनिक्सने पतंजलीच्या कापूर उत्पादनांच्या कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप करत त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. त्यानंतर मंगलम ऑर्गेनिक्सनं अर्ज दाखल करून पतंजली आपल्या अंतरिम आदेशाचं उल्लंघन करून कापूर उत्पादनांची विक्री करत असल्याचा दावा केला.
पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही देशातील एक प्रसिद्ध कंपनी आहे जी आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती आणि विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीची स्थापना बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी केली होती. पतंजली आयुर्वेदनं अतिशय कमी कालावधीत भारतीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.