नवी दिल्ली : भारतासह अनेक देशांनी बंदी घातल्यानंतर क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनची पिछेहाट झाली असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आभासी चलनातील संपत्तीचे मूल्य वाढलेलेच आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या जेफ बेझोस आणि बिल गेटस् यांच्या एकत्रित संपत्तीएवढी संपत्ती सध्या आभासी चलनात असल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी एका बिटकॉईनचे मूल्य एक औंस सोन्यापेक्षा जास्त झाले होते.
बिटकॉईन हे काही एकमेव क्रिप्टो चलन नाही. लाईटकॉईन, मोनेरो आणि आणखी बरीच क्रिप्टो चलने आभासी बाजारात आहेत. याक्षणी जगातील सर्व आभासी चलनांचे (क्रिप्टोकरन्सी) मूल्य २०२ अब्ज डॉलर आहे. त्यात बिटकॉईनचे मूल्य ११२ अब्ज डॉलर आहे. जेफ बेझोस (११२ अब्ज डॉलर) आणि बिल गेटस् (९० अब्ज डॉलर) यांची संपत्ती एकत्र केली तरी क्रिप्टो चलनातील या संपत्तीएवढे मूल्य भरते. बिटकॉईनमधील गुंतवणूक अनेक छोट्या देशांच्या जीडीपेक्षा जास्त आहे. जगातील शेअर बाजार, चलनी नोटा, सोने इत्यादी स्वरुपातील संपत्तीचे मूल्य ८६.५ लाख कोटी डॉलर आहे. एक लाख कोटी म्हणजे एक ट्रिलियन होय. यातील शेअर बाजारातील गुंतवणुकीचे मूल्य ६७.५ लाख कोटी डॉलर आहे.
जगात वापरल्या जाणाऱ्या एकूण सोन्याचे मूल्य ७.८ लाख कोटी डॉलर आहे. गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या मूल्यात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. २०१७ मध्ये सोन्यामधील गुंतवणुकीचे मूल्य ८.२ लाख कोटी डॉलर होते. बिटकॉईन आणि सोन्यामधील एक साम्य असे आहे की, या दोन्हीमधील संपत्ती औपचारिक बँकिंग व्यवस्थेपासून दूर आहे.
सर्व देशांच्या चलनी नोटा व नाण्यांचे मूल्य ३४.४ लाख कोटी डॉलर आहे. नोटा आणि नाणी या स्वरुपात चलनात असलेल्या अमेरिकी डॉलरचे एकूण मूल्य १.५ लाख कोटी डॉलर आहे. बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी अॅमेझॉनचे मूल्य ४०२ अब्ज डॉलर, तर अॅपलचे मूल्य ७३० अब्ज डॉलर आहे. अॅमेझॉन आणि अॅपलचे मूल्य अनुक्रमे नायजेरिया आणि नेदरलॅण्ड यांच्या अर्थव्यवस्थांपेक्षा अधिक आहे.
बिटकॉईनचे तौलनिक स्थान
जगातील एकूण पैसा : ८६.५ लाख कोटी डॉलर
शेअर बाजारातील पैसा : ६७.५ लाख कोटी डॉलर
चलन स्वरुपात पैसा : ३४.४ लाख कोटी डॉलर
सोन्यातील पैसा : ७.८ लाख कोटी डॉलर
डॉलरमधील पैसा : १.५ लाख कोटी डॉलर
अॅपलचे मूल्य : १ लाख कोटी डॉलर
अॅमेझॉनचे मूल्य : ९७० अब्ज डॉलर
सर्व क्रिप्टो चलनाचे मूल्य : २०२ अब्ज डॉलर
जेफ बेझोस यांची संपत्ती : ११२ अब्ज डॉलर
बिटकॉईनचे मूल्य : ११२ अब्ज डॉलर
बिल गेटस् यांची संपत्ती : ९० अब्ज डॉलर
क्रिप्टोकरन्सीची पीछेहाट; तरीही मूल्यात झाली वाढ
आभासी चलन जेफ बेझोस व बिल गेटस् यांच्या एकत्रित संपत्तीएवढे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 01:34 AM2019-06-22T01:34:40+5:302019-06-22T01:34:53+5:30