नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. ऑगस्टमध्ये आठ महत्त्वपूर्ण क्षेत्रांच्या वाढीचा दर अर्धा टक्क्यानं घसरला आहे. गेल्या साडेतीन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. याआधी नोव्हेंबर २०१५ मध्ये १.३ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आठ महत्त्वपूर्ण क्षेत्रातील घसरणीची आकडेवारी काल केंद्र सरकारनं जाहीर केली.
अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याचे कोणतेही परिणाम होताना दिसत नाहीत. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण उत्पादनं, खतं, सिमेंट, वीज, स्टिल यांचा आठ महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये समावेश होतो. ऑगस्टमध्ये या क्षेत्रांची वाढ ४.७ टक्क्यांनी झाली. आठ महत्त्वपूर्ण क्षेत्रांपैकी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, सिमेंट, वीज या क्षेत्रांमध्ये अनुक्रमे ८.६%, ५.४%, ३.९%, ४.९% आणि २.९% इतकी घसरण पाहायला मिळाली.
गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये आठ महत्त्वपूर्ण क्षेत्रांच्या वाढीचा दर ५.७ टक्के इतका होता. मात्र त्यात यंदा मोठी घट झाली आहे. ऑगस्टमध्ये प्रमुख क्षेत्रांच्या वाढीचा दर अतिशय कमी आणि निराशाजनक असल्याचं इक्रा या रेटिंग एजन्सीनं म्हटलं आहे. आठपैकी सहा क्षेत्रांची वाढ घटली आहे. वर्षाच्या कामगिरीचा विचार केल्यास पाच क्षेत्रांमधील कामगिरी खालावली आहे, असं इक्रानं अहवालात म्हटलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा अंदाज प्रमुख क्षेत्रांच्या कामगिरीवरुन घेतला जातो. सध्या याच क्षेत्रांची स्थिती निराशाजनक असल्यानं अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
अर्थव्यवस्थेचे बुरे दिन सुरुच; आठ प्रमुख क्षेत्रांची कामगिरी खालावली
आठपैकी सहा क्षेत्रांची कामगिरी अतिशय वाईट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 08:24 AM2019-10-01T08:24:57+5:302019-10-01T08:26:06+5:30