Join us

Badshah Masala Deal: मसाल्यांचा बादशाह विकला गेला! प्रसिद्ध डाबर कंपनीने अचानक केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 10:28 AM

बादशाह मसाला कुटलेले मसाले, मिश्रित मसाले आणि इतर खाद्य पदार्थांचे उत्पादन, विक्री आणि निर्यात करते. डाबर इंडियाने शेअर बाजाराला याची माहिती दिली आहे.

मसाल्यांचा बादशाह असलेली कंपनी बादशाह मसाला आता डाबर इंडियाच्या मालकीची होणार आहे. अचानक या व्यवहाराची घोषणा झाली आहे. सप्टेंबर तिमाहीतील निकाल जारी होताच, डाबर इंडियाने बादशाह मसाल्यामध्ये समभाग खरेदी करण्याची घोषणा केली आहे. 

डाबर कंपनी बादशाह मसाल्यामध्ये 51 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. यासाठी पक्क्या अॅग्रीमेंटवर सह्या झाल्याचेही दोन्ही कंपन्यांनी संयुक्तरित्या सांगितले आहे. या डीलमुळे बादशाह मसाला आता डाबरचा होणार आहे. डाबर यासाठी 587.52 कोटी रुपये मोजणार आहे. 

बादशाह मसाला कुटलेले मसाले, मिश्रित मसाले आणि इतर खाद्य पदार्थांचे उत्पादन, विक्री आणि निर्यात करते. डाबर इंडियाने शेअर बाजाराला याची माहिती दिली आहे. 51 टक्के इक्विटी स्टेकसाठी 587.52 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे, असे या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. 

बादशाह मसाल्याची किंमत 1,152 कोटी रुपये होती. उर्वरित ४९ टक्के भागभांडवल पुढील पाच वर्षांनी विकत घेतले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. या अधिग्रहणामुळे डाबर इंडियाचा फूड बिझनेस तीन वर्षांत 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये, डाबर इंडियाच्या एकत्रित नफ्यात 2.85 टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 490.86 कोटी इतका होता. 

डाबरच्या फूड्स अँड बेव्हरेजेस डिव्हिजनमध्ये 30 टक्क्यांनी मजबूत वाढ नोंदविली आहे. फूड्स व्यवसायाने 21 टक्के वाढ नोंदविली, तर बेव्हरेजेस व्यवसायाने सप्टेंबर तिमाहीत 30 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली. डाबर रेड पेस्टने 11 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली.