जानेवारीच्या महिन्यात राज्यात काय; पण चक्क मुंबईतदेखील थंड हवेची झुळूक वाहत असते. मग नववर्षातला पहिला सण येतो तो म्हणजे संक्रांत. तीळगूळ, गूळपोळ्या, लहान मुलांना सजविण्यासाठी हलव्याचे दागिने, काळ्या रंगाच्या आकर्षक पेहरावात सजणारा महिलावर्ग अन् बाहेरच्या आसमंतात असलेल्या थंड हवेच्या झुळकेमध्ये पतंगांची काटाकाटी करणारे पतंगप्रेमी... तर नववर्षाचा पहिला सण असा उत्साहात साजरा होतो. कोरोनानंतर गेल्या दोन वर्षांपासून संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आकाशात पतंगांचे रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. खरं तर संक्रांतीचे खरे आकर्षण म्हणजे पतंगच. पण कोरोनाच्या काळात पूर्णपणे झोपलेला हा व्यवसाय आता नव्याने ‘बधण्यास’ सुरुवात झाली आहे. याच पतंग उद्योगाच्या अर्थकारणाचा
हा वेध.
पतंगांचे प्रकार तरी किती?
जितकी माणसाची कलात्मक विचारदृष्टी तेवढे पतंगांचे प्रकार. अगदी अर्धा फुटाच्या पतंगांपासून तब्बल ५० फुटांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध आहे. साधा कागद, घोटीव पेपर, बटर पेपर इथपासून ते विविध प्रकारच्या हलक्या कापडापासून पतंग तयार केले जातात. त्यांची किंमत सांगायची तर १० रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतचे पतंग बाजारात आजच्या घडीला उपलब्ध आहेत. कोरोनापूर्वी मुंबईत संक्रांतीच्या दिवसात मुंबईत साधारणपणे ८ कोटी रुपयांच्या आसपास पतंगांची उलाढाल होत असे. मात्र कोरोनाचे सावट संपल्यानंतर गेल्या वर्षी मुंबईत हा आकडा १० कोटींवर गेला. यंदा संक्रांत जरी १५ जानेवारीला म्हणजेच सोमवारी आली असली तरी त्या आधीचा दिवस रविवार असल्याने यंदा पतंगांच्या खरेदीची उलाढाल १२ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज पतंग व्यावसायिक मोहम्मद शेख यांनी व्यक्त केला. मुंबईत त्यांचे दुकान प्रसिद्ध आहे आणि वर्षभर ते केवळ हाच व्यवसाय करतात.
एकट्या गुजरातमध्ये ८०० कोटींचा व्यवहार
मकरसंक्रांतीचा सण गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तिथे जवळपास प्रत्येक घराची गच्ची ही पतंग शौकिनांच्या गर्दीने ओसंडून वाहत असते. हा असंघटित व्यापार आहे. मात्र, एका आकडेवारीनुसार, संक्रांतीच्या काळात गुजरातमध्ये अंदाजे ८०० कोटी रुपयांच्या आसपास पतंग उद्योगात उलाढाल होते. तर, या क्षेत्रामुळे तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये किमान ५० हजार लोकांना रोजगार मिळतो. विशेष म्हणजे यातील बहुतांश कामगार हे उत्तर प्रदेशातून त्या कालावधीमध्ये गुजरातमध्ये स्थलांतरित होतात. येथील पतंगांच्या कारखान्यातून संपूर्ण गुजरातमध्येच नव्हे तर मुंबई व कोलकाता येथेदेखील मोठ्या प्रमाणावर पतंगांना ऑर्डर असते. लाखांपर्यंतची उलाढाल ते करतात.
गृहसजावटीमध्येदेखील पतंगांचा वापर
लोक फक्त संक्रांतीदरम्यान किंवा एरवीही आवड म्हणून पतंग उडवत नाहीत तर अलीकडच्या काळात गृहसजावटीमध्येदेखील पतंगांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. दिवाणखान्यामध्ये आकर्षक सजावटीसाठी अनेकवेळा पतंगाचा वापर केला जातो. घराच्या सजावटीच्या थीमनुसार हवे तसे पतंग बनवून घेण्याकडेदेखील लोकांचा कल आहे. या सजावटीमध्ये वापरले जाणारे पतंगही दीर्घकाळ टिकावे म्हणून उत्तम दर्जाच्या कागदांपासून किंवा कापडांपासून बनवले जातात. त्यामुळेच त्यांच्या किमती या १,५०० ते २००० पासून ते तब्बल २५ ते ३० हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे हा व्यवसाय वर्षभर सुरू असतो.
खरेदी कशी होते?
पतंगांमध्ये त्याची कणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे कागद असो किंवा कापड त्याची मध्यवर्ती दांडी किती मजबूत आणि किती लवचिक यावर कणी बांधली जाते.
कणी नीट जमली तरच पतंग उंच उडतो. त्यातही मग स्थिर पतंग कोणता आणि तुडतुड्या कोणत्या हादेखील शौकिनांच्या खरेदीमधील विशेष मुद्दा आहे. त्यामुळे स्थिर पतंग उडवण्यात रस आहे की काटाकाटीमध्ये ते विक्रेत्याला सांगून त्यानुसारच पतंगांची खरेदी करावी. या दोन्हीच्या बाह्यरूपात फारसा फरक नसला तरी त्याच्या गुणधर्मात मात्र निश्चित फरक आहे. पतंगांसोबत मांजा आणि फिरकी आवश्यक घटक आहे. साधारणपणे काटाकाटी करायची असेल तर १० रुपयांचा पतंग, फिरकी आणि काही मीटर मांजा असा हिशेब केला तरी १०० रुपयांपर्यंत किमान खर्च जातो. नायलॉनच्या मांजावर बंदी आहे. मात्र, सामान्य मांजाच्या माध्यमातूनही काटाकाटी सहज शक्य असल्याचे जाणकार सांगतात.