सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची चांदीच चांदी झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या सार्वजनिक बँकेने आपल्या अधिकाऱ्यांना मोबाईल हँडसेट विकत घेण्यासाठी वर्षाला दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आता एवढ्या किंमतीत ते आयफोन, सॅमसंगचा नोट किंवा महागडे फोन घेऊ शकणार आहेत.
पीटीआयनुसार कर्मचारी कल्याणच्या नियमांमध्ये पीएनबी बँकेने सुधारणा केली आहे. याद्वारे पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) उच्चाधिकाऱ्यांना 2 लाख रुपयांचा हँडसेट भत्ता दिला जाईल. यामध्ये व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि कार्यकारी संचालक यांचा समावेश आहे.
पंजाब नॅशनल बँकेचे चार कार्यकारी संचालक आहेत. या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना मोबाइल हँडसेट खरेदीसाठी दरवर्षी दोन लाख रुपये मिळतील, असे अहवालात म्हटले आहे. PNB बोर्डाच्या निर्णयानुसार, सुधारित नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत, असे सुत्रांनी सांगितले.
बँकेतील मुख्य महाव्यवस्थापक (CGM) साठी मोबाईल फोनसाठीची पात्रता पूर्वीच्या स्तरावर कायम ठेवण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, CGM साठी हँडसेट भत्ता वार्षिक 50,000 रुपये आणि GM साठी 40,000 रुपये निश्चित केला आहे.