90-hour work week row: बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज आणि हेलिओस कॅपिटलचे संस्थापक समीर अरोरा यांनीही वर्क-लाइफ बॅलन्सच्या वादात उडी घेतली आहे. आठवड्याला ९० तासांचं वर्क कल्चर हवं असेल तर त्याची सुरुवात वरिष्ठ पातळीपासून करा, असं परखत मत राजीव बजाज यांनी मांडलं. तर दुसरीकडे, सीईओ होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. एखाद्या कंपनीचा प्रवर्तक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जे काही करतो, ते साध्य करण्यासाठी त्यानं खूप मेहनत घेतलेली असते असं मत फंड मॅनेजर समीर अरोरा यांनी व्यक्त केलं.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षभरापासून वर्क लाईफ बॅलन्सची चर्चा वाढली आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या एका वक्तव्यापासून याची चर्चा सुरू झाली होती. देशातील प्रोडक्टिव्हिटी वाढविण्यासाठी भारतातील तरुणांनी आठवड्यातून किमान ७० तास काम करावं, असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील ९० तास काम करावं आणि रविवारीही काम करण्यास संकोच करू नये, असं आवाहन लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यन यांनी केलं. वर्क-लाईफ बॅलन्सच्या वादामुळे या दोन्ही विधानांवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.
काय म्हणाले बजाज?
"याची सुरुवात सर्वात वरिष्ठ स्तरापासून केली पाहिजे. तुम्ही किती तासकाम करता हे महत्त्वाचं नाही, तुमच्या कामाचा दर्जा किती चांगला आहे हे महत्त्वाचं आहे. जगाला आता पूर्वीपेक्षा दयाळू आणि सौम्य स्वभावाच्या लोकांची गरज आहे," असं बजाज म्हणाले.
कर्मचाऱ्यांचं ऐकणं गरजेचं
लीडर्सनं आपल्या रणनीतीचा पुनर्विचार करावा, असंही ते म्हणाले. त्यांनी एक उदाहरण देत, फीडबॅकदरम्यान, त्यायंच्या सहकाऱ्यानं कंपनीच्या रचनेबद्दल कशी टीका केली होती याबद्दल सांगितलं. "फ्रन्टलाईनवर काम करणाऱ्यांना सिस्टममधील समस्येबद्दल माहीत असतं, पण त्यांच्याकडे कोणताही अधिकार नसतो. तर टॉप मॅनेजमेंटला अधिकार असतात, पण खाली काय चालू आहे याची माहिती नसते. त्यामुळे अशा टीका समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे जलद आणि योग्य निर्णय घेता येतील," असंही बजाज यांनी स्पष्ट केलं. सीएनबीसी टीव्ही १८ शी साधलेल्या विशेष संवादादरम्यान बजाज यांनी यावर वक्तव्य केलं.
काय म्हणाले अरोरा?
करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी दिवसाचे १३ तास काम केलं. त्यानंतर नवीन ऑफिसचं काम सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होत होतं. सगळे जण घरी जाऊ लागायचे, ४ वाजेपर्यंत ऑफिस रिकामे व्हायचे. यामुळे आपल्याला कंटाळा आणि कंटाळा येऊ लागला आणि आधीच्या कंपनीत परतलो, असं फंड मॅनेजर समीर अरोरा यांनी सांगितलं. सुरुवातीला शिकण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणालेले सुब्रमण्यन?
‘तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोचे तोंड किती वेळ बघू शकता? बायका आपल्या नवऱ्यांची तोंडं किती वेळ पाहू शकतात? ऑफिसला या आणि काम सुरू करा. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात ९० तास काम करायला हवं; स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रविवारच्या दिवशीही ऑफिसात येऊन काम करणं गरजेचं आहे, असं सुब्रमण्यन म्हणाले होते.