Bajaj Auto Madhur Bajaj: बजाज ऑटोचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मधुर बजाज यांचं शुक्रवारी निधन झालं. शुक्रवारी सकाळी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे आज पहाटे ५ वाजता त्यांचं निधन झालं. दरम्यान, २४ जानेवारी २०२४ रोजी आपल्या आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. बजाज ऑटोचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असण्याबरोबरच त्यांनी महाराष्ट्र स्कूटर लिमिटेडचे अध्यक्षपदही भूषवलं होतं.
मधुर बजाज यांनी बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड आणि बजाज समूहातील इतर कंपन्यांचं संचालक पद भूषवलं होतं. मधुर बजाज हे देहरादूनच्या बजाज दून स्कूलचे माजी विद्यार्थी होते. मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून बी कॉमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून एमबीए केलं. मधुर बजाज यांना 'विकास रतन' पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी ऑफ इंडियाकडून त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.