बजाज ऑटो लि.ने शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) शेअर बायबॅकमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र भागधारक निश्चित करण्यासाठी २९ फेब्रुवारी ही रेकॉर्ड तारीख अंतिम केली आहे. संचालक मंडळानं स्थापन केलेल्या बायबॅक समितीनं इक्विटी भागधारकांची पात्रता आणि नावं निश्चित करण्याच्या उद्देशानं गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे, असं कंपनीने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटलं आहे. या तारखेपर्यंत भागधारक बायबॅकमध्ये सहभागी होण्यास पात्र असतील.
मागील महिन्यात ९ जानेवारी २०२४ रोजी कंपनीच्या बोर्डानं प्रत्येकी १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या ४० लाख शेअर्सच्या बायबॅकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या अंतर्गत १० रुपये फेस व्हॅल्यू सलेले शेअर्स १० हजार रुपये प्रति शेअर या भावाने बायबॅकसाठी मंजूर करण्यात आले. यामुळे बायबॅकचे एकूण मूल्य ४ हजार कोटी रुपये होईल. दरम्यान, शुक्रवारी कंपनीचा शेअर २२०.९५ रुपयांच्या वाढीसह ८,३४४ रुपयांवर बंद झाला.
गेल्या एका आठवड्यात या शेअरच्या किंमतीत ६.९४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर १४.१४ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. जर आपण एका वर्षाबद्दल बोललो तर गेल्या एका वर्षात यात ११३.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शेअरची ५२ आठवड्यांची सर्वोच्च पातळी ८४५५ रुपये होती. तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३६२५ रुपये आहे.
(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)