Join us

Bajaj CNG Bike : "टायगर अभी जिंदा है," जगातील पहिली CNG Bike बनवणारे राजीव बजाज का म्हणाले असं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 1:14 PM

Bajaj CNG Bike : बजाज ऑटो, टीव्हीएस आणि हीरो ग्रुप यांचं मोटरसायकल बाजारात दीर्घकाळापासून वर्चस्व आहे. या तिन्ही कंपन्या एकमेकांच्या स्पर्धकही आहेत. अशातच बजाज ऑटोने जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करून बाजारात खळबळ उडवून दिली.

बजाज ऑटो, टीव्हीएस आणि हीरो ग्रुप यांचं मोटरसायकल बाजारात दीर्घकाळापासून वर्चस्व आहे. या तिन्ही कंपन्या एकमेकांच्या स्पर्धकही आहेत. अशातच बजाज ऑटोने जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करून बाजारात खळबळ उडवून दिली. पण लॉन्चिंगच्या निमित्तानं बजाज ऑटोचे प्रमुख राजीव बजाज यांनी हीरो समूहाबद्दल एक चांगली गोष्ट सांगितली. 'टायगर अभी जिंदा है,' असं विधानही त्यांनी केलं होतं. काय आहे यामागची कहाणी पाहूया...

नुकतीच बजाज ऑटोनं जगातील पहिली सीएनजी बाईक 'बजाज फ्रीडम' लॉन्च केली. या बाईकमध्ये १२५ सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. तसंच यात २ लिटरची पेट्रोलची टाकी आणि २ किलोचा सीएनजी सिलिंडर आहे. फुल टँक पेट्रोल आणि फुल सीएनडी भरल्यानंतर ही बाईक एकून ३३० किमीपर्यंत चालते. कंपनीनं याची सुरुवातीची किंमत ९५,००० रुपये ठेवली आहे.

का म्हणाले 'टायगर अभी जिंदा है'?

राजीव बजाज यांनी हीरो मोटर्सशी निगडीत एक किस्सा सर्वांसोबत शेअर केला. १९९० च्या दशकात भारतात बजाज चेतकची विक्री कमी होण्यास सुरूवात झाली होती आणि त्याची जागा बाजारात मोटरसायकलनं घेतली. याचं कारण म्हणजे स्कूटरच्या तुलनेत मोटरसायकलचं मायलेज अधिक असणं. १९९७ मध्ये पहिल्यांदाच हीरो होंडाची (आताची हीरो मोटोकॉर्प) यांची विक्री बजाजपेक्षा अधिक झाली होती.

"तेव्हा हीरो होंडाचे चेअरमन बृजमोहन लाल होते. जेव्हा हीरोची विक्री बजाज पेक्षा अधिक झाली तेव्हा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना थोडं लक्ष ठेवा, वाघ (बजाज) आता जखमी झाला आहे. सीएनजी बाईक लॉन्च करून ३० वर्षांनी आम्ही त्यांना सांगितलं की टायगर अभी जिंदा है," असं राजीव बजाज म्हणाले.

सीएनजी बाईकचं इकॉनॉमिक्स

दरम्यान, राजीव बजाज यांनी सीएनजी बाईकचं इकॉनॉमिक्सही समजावलं. १९९० मध्ये स्कूटरची विक्री कमी होण्यामागचं कारण इंधनाचे दर वाढणं हे होतं. तेव्हा त्या ४० किमीचं मायलेज द्यायच्या. अशातच मोटरसायकलनं फ्युअल कॉस्टमध्ये मायलेज वाढवून ६० ते ८० किमी पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं.३० वर्षांनंतर आपण त्याच ठिकाणी उभे आहोत जिकडे या किंमती वाढल्या आहेत. आम्ही त्याच फ्युअल कॉस्टमध्ये मायलेज ३३० किमी करण्याचं काम केलंय, असं बजाज म्हणाले.

टॅग्स :बजाज ऑटोमोबाइलबाईक