Join us

बजाज इलेक्ट्रिकल्सने केले निर्लेप टेकओव्हर, सहा महिन्यांत होणार व्यवहार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 2:06 AM

भारतामध्ये १९६८ च्या दशकात स्वयंपाकासाठी लागणारी उत्पादने नॉनस्टिक टेक्नॉलॉजीतून आणून क्रांती करणारा निर्लेप उद्योग समूह बजाज इलेक्ट्रिकल्स टेकओव्हर करणार आहे. सहा महिन्यांत धोरणात्मक बाबींचा विचार होऊन व्यवहार पूर्ण होईल.

औरंगाबाद : भारतामध्ये १९६८ च्या दशकात स्वयंपाकासाठी लागणारी उत्पादने नॉनस्टिक टेक्नॉलॉजीतून आणून क्रांती करणारा निर्लेप उद्योग समूह बजाज इलेक्ट्रिकल्स टेकओव्हर करणार आहे. सहा महिन्यांत धोरणात्मक बाबींचा विचार होऊन व्यवहार पूर्ण होईल.सध्या ४२.५० कोटी रुपयांमध्ये निर्लेपचे बजाज इलेक्ट्रिकल्सकडे हस्तांतरण झाल्याचे बोलले जात असले तरी अद्याप रक्कम ठरली नसल्याचे निर्लेप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राम भोगले यांनी ‘लोकमत’ सांगितले. या व्यवहारानुसार ८० टक्के समभाग बजाज इलेक्ट्रिकल्सकडे तर २० टक्के समभाग स्वत:कडे राहतील.भोगले म्हणाले की, ब्रॅण्डच्या हिताचे काही निर्णय घ्यावे लागतात. मार्केटची परिस्थिती, गरजा व गुंतवणुकीचा आवाका याचा विचार करून, आपली ताकद किती आहे, याचा विचार करणे शिकले पाहिजे. ताकदीच्या बाहेर काही गोष्टी होत असल्याने चिकटून राहणे योग्य नसते. सकारात्मक बाब ही की, हा उद्योग पक्क्या भारतीय कंपनीकडे गेला आहे.पन्नास वर्षांत अनेक गोष्टी बदलल्या. सतत बदलणाऱ्या जगात तुम्ही कसे राहता, याचा विचार करणे गरजेचे आहे. कंपनीच्या उत्कर्षासाठी त्यावरील आपला हक्क सोडावा, याचा विचार केला आहे. निर्लेप बॅ्रण्डसाठीच हा व्यवहार केला आहे. नॉनस्टिकमध्ये एवढा मोठा व्यवहार फक्त ब्रॅण्डमुळेच झाला आहे. करारामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भारतीय बॅ्रण्ड वाढविणे, त्याची विश्वसनीयता कायम ठेवणे हा आहे. व्यवहाराच्या स्टेप्स वेगळ्या असतात.व्यवहारातून उपलब्ध झालेली रक्कम वाळूजच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करता येईल. निर्लेपचे उत्पादन औरंगाबादमध्येच होत आहे. निर्यातीमध्ये चांगला टक्का होता. बजाजला सेलेबल ब्रॅण्ड, तंत्रज्ञान आणि रिलायबल भागीदार मिळाले आहेत. त्यामुळे बॅ्रण्ड निश्चितपणे पुढे जाईल.का विकले शेअर्स?निर्लेप उद्योग समूह मागील तीन वर्षांपासून मार्केट शेअरमध्ये मागे पडत आहे. तीन वर्षांत दरवर्षी होणारी उलाढाल पाहता कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. या क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्या व त्यांच्या मार्केटिंग धोरणासमोर निर्लेपचा निभाव लागणे अवघड होत होते. कंपनीची २०१६ साली ७९ कोटी, २०१७ साली ५४ कोटी, २०१८ साली ४७ कोटींची वार्षिक उलाढाल झाल्याची माहिती आहे. हा आलेख पाहता निर्लेप ब्रॅण्डच्या उत्कर्षासाठीच शेअर्स विकण्याचा निर्णय झाल्याचे दिसते आहे. 

टॅग्स :व्यवसायभारत