Join us

'बजाज'ची कंपनी बुडाली, 'स्टेट बँक ऑफ इंडिया'नं केली दिवाळखोरीची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 5:54 PM

बजाज हिंदुस्तान शुगरच्या शेअरमध्ये आज तब्बल १४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे कंपनीला मोठा फटका सहन करावा लागला आहे.

नवी दिल्ली- 

बजाज हिंदुस्तान शुगरच्या शेअरमध्ये आज तब्बल १४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे कंपनीला मोठा फटका सहन करावा लागला आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) बजाज हिंदुस्तान शुगर कंपनीच्या विरोधात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये (NCLT) दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. 

कंपनीने १६ ऑगस्ट रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिवाळखोरी संहितेअंतर्गत एनसीएलटीच्या अलाहाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजाज हिंदुस्तान शुगरकडे एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांसारख्या बँकांचे सुमारे ४,८०० कोटी रुपये थकीत आहेत. 

बुधवारी बाजार बंद होईपर्यंत कंपनीचा शेअर १२.९८ टक्क्यांपर्यंत घसरला आणि तो ८.९१ रुपयांवर बंद झाला. २२ एप्रिलपासून त्यात घसरण सुरूच आहे. २२ एप्रिल २०२२ रोजी याच शेअरनं २२.५८ रुपयांचा उच्चांक गाठला होता. 

काय काम करते कंपनी?मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, कर्ज देणाऱ्या बँका आणि संस्था सहसा थकबाकी न भरल्याबद्दल कॉर्पोरेट कोर्टात दिवाळखोरी याचिका दाखल करतात. न्यायालयानं याचिका स्वीकारल्यानंतर, कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू होते. बजाज हिंदुस्तान ही साखर आणि इथेनॉल निर्मिती करणारी कंपनी आहे. हा बजाज समूहाचा भाग आहे आणि त्यांचं मुख्यालय मुंबईत आहे. कंपनीचे १४ साखर कारखाने आहेत. हे सर्व उत्तर प्रदेशात आहेत आणि सहा डिस्टिलरीज आहेत, ज्यांची क्षमता दिवसाला ८०० किलो लिटर औद्योगिक अल्कोहोल तयार करण्याची क्षमता आहे.

कंपनी आपल्या साखर कारखान्यांमध्ये उत्पादित केलेल्या बगॅसपासून सुमारे ४३० मेगावॅट (MW) वीज देखील तयार करते आणि उत्तर प्रदेश राज्य ग्रीडला सुमारे १०० MW वीज पुरवठा करते. त्याच्या साखर उत्पादन युनिटला लागून पाच ९० मेगावॅटचे कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प देखील आहेत, जे राज्य ग्रीडसाठी ४५० मेगावॅट वीज निर्माण करतात.

विशेष म्हणजे एप्रिल-जूनच्या तिमाहीत कंपनीला ४४.९१ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ४९.७२ कोटी रुपयांच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत होता. समीक्षाधीन तिमाहीत विक्री १३.११ टक्‍क्‍यांनी वाढून १,५२९.९२ कोटी झाली आहे. जी मागील वर्षी १,३५२.६१ कोटी होती.

टॅग्स :साखर कारखाने