नवी दिल्ली - सोन्याच्या दागिन्यांच्या मुक्त आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली असून, त्यांच्या आयातीसाठी आता सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. ‘विदेश व्यापार महासंचालनालया’ने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, काही विशिष्ट प्रकारचे हिरे आणि मौल्यवान खडे यांच्या दागिन्यांची आयात आतापर्यंत ‘मुक्त’ श्रेणीत होती. ती आता ‘नियंत्रित’ श्रेणीत टाकण्यात आली आहे. काही दागिने आणि त्यांच्या सुट्या भागांच्या आयातीवर बंदी लादण्यात आली आहे. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू होईल.
पाच प्रकारातील सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीसाठी परवानगी घ्यावी लागेल. ‘सर्वंकष आर्थिक भागीदारी करारा’च्या (सीईपीए) माध्यमातून होणाऱ्या आयातीवर बंदी नसेल. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुवर्ण आभूषणांच्या मुक्त आयातीस मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे मुक्त व्यापार करार (एफटीए) असलेल्या देशांतून सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढली होती.
कोणत्या दागिन्यांवर बंदी?
- मोती जडवलेले सोने
- हिरे जडवलेले सोने
- मौल्यवान खडे जडवलेले सोने
- अर्ध-मौल्यवान खडे जडवलेले सोने
- सुवर्ण सुटे भाग
सरकारचे म्हणणे काय?
सरकारने म्हटले की, वास्तविक एचएसएन कोडतहत दागिन्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली नाही. केवळ आयातीत झालेल्या असामान्य वाढीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी, तसेच कोठून किती आयात होत आहे, याची माहिती मिळविण्यासाठी आयातीला निगराणी श्रेणीत ठेवले आहे.