Join us

IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:23 AM

IIFL Share Price Today : कंपनीच्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी उठवताच शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात त्याचे शेअर्स रॉकेट बनले. पाहा कोणती आहे ही कंपनी?

IIFL Share Price Today: आयआयएफएलने गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी उठवताच शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात त्याचे शेअर्स रॉकेट बनले. सुरुवातीला हा शेअर ५४९ रुपयांवर उघडला आणि जवळपास १० टक्क्यांनी वाढून ५५५ रुपयांवर पोहोचला. मात्र, त्यानंतर तो ९ टक्क्यांहून अधिक वाढून ५४२ रुपयांवर पोहोचला.

रिझर्व्ह बँकेने आयआयएफएल फायनान्सच्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी उठवली आहे. ४ मार्च २०२४ रोजी हे निर्बंध लागू करण्यात आले होते, ज्यामुळे कंपनीला कोणतेही गोल्ड लोन मंजूर करण्यास, वितरित करण्यास मनाई करण्यात आली होती. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं आयआयएफएल फायनान्स लिमिटेडच्या गोल्ड लोन व्यवसायावर घातलेले निर्बंध १९ सप्टेंबर २०२४ च्या नोटिसीद्वारे उठवले आहेत. रिझर्व्ह बॅंकेचा हा निर्णय तात्काळ लागू असून कंपनीला गोल्ड लोनची मंजुरी, वितरण, सिक्युरिटायझेशन आणि विक्री पुन्हा सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

१९ वर्षांत ७०००% पेक्षा जास्त परतावा

२० मे २००५ रोजी कंपनीचा शेअर ७.७९ रुपयांवर होता आणि आज त्यात ७००० टक्क्यांपेक्षा अदिक वाढ होऊन तो ५५० च्या जवळपास पोहोचला आहे. त्यावेळी जर कोणी त्यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आतापर्यंत ती ठेवली असती, तर आता एक लाखाचं मूल्य ७० लाखांहून अधिक झालं असतं. गेल्या महिनाभरात शेअरनं २० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, सहा महिन्यांत सुमारे ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ६८३.१९ रुपये आणि नीचांकी स्तर ३०४.२५ रुपये आहे. कंपनीचं बाजार भांडवल २२.८९ हजार कोटी रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :सोनंशेअर बाजार