नवी दिल्ली : तामिळनाडूतील व्यापारी संघटनांनी पेप्सीको आणि कोका-कोला यांच्या शीतपेयांवर १ मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे या कंपन्यांचा १,४00 कोटी रुपयांचा महसूल बुडू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.तामिळनाडूतील फेडरेशन आॅफ तामिळनाडू ट्रेडर्स असोसिएशन आणि अन्य काही व्यापारी संघटनांनी पेप्सीको आणि कोका-कोलाच्या शीतपेयांची विक्री थांबविण्याचा निर्णय याच आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर केला होता. या बंदीत सहभागी संस्थांच्या सदस्यांकडे १.५ दशलक्ष किरकोळ दुकाने आहेत. याशिवाय ६ हजार छोट्या संघटनाही या बंदीत सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोका-कोला आणि पेप्सीको या दोन कंपन्यांचा मिळून ८५ टक्के शीतपेय बाजारपेठेवर ताबा आहे. याशिवाय पेप्सीको अनेक महत्त्त्वाची खाद्य उत्पादनेही विकते. ही उत्पादनेही लोकप्रिय आहेत. ही बंदी शीतपेयांपुरतीच मर्यादित आहे की, अन्य खाद्य उत्पादनांचाही बंदीत समावेश केला जाणार आहे, याबाबत कोणतेही स्पष्टिकरण अद्याप करण्यात आलेले नाही. या दोन्ही कंपन्यांच्या नुसत्या शीतपेयांच्या विक्रीवर बंदी घातली तरी १,४00 कोटींचा फटका कंपन्यांना बसणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
बंदीमुळे पेप्सी, कोका-कोलाचा १,४00 कोटींचा महसूल बुडणार?
By admin | Published: January 28, 2017 12:50 AM