एखाद्या व्यक्तीनं ५३ कोटींचं केळं खाल्लं आहे असं जर कुणी म्हणत असेल तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अलीकडेच चिनी क्रिप्टो उद्योजक जस्टिन सन यांनी लिलावात केळं खरेदी केलं. न्यूयॉर्कमधील सोथबी येथील लिलावादरम्यान टेपनं चिकटवलेलं एक केळं जस्टिन सन यांनी ६२ लाख डॉलर (सुमारे ५३ कोटी रुपये) मध्ये खरेदी केलं होतं. यानंतर जस्टिन सन यांनी ते स्टेजवर खाऊन टाकलं. हे केळं इतर केळ्यांपेक्षा अतिशय चवदार आणि चांगले आहे. हे खरंच चांगलं आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी यानंतर दिली.
या आर्टसाठी बोली आठ लाख डॉलर्सपासून सुरू झाली आणि अवघ्या एका मिनिटानंतर त्यात १५ लाख डॉलर्सची वाढ झाली. "हे केवळ केळं नाही, तर ते एक सांस्कृतिक घटनेचं प्रतिनिधित्व करते, जे कला, मीम्स आणि क्रिप्टोकरन्सी समुदायांना जोडते," असं चिनी उद्योजक जस्टिन सन म्हणाले.
२०१९ पहिल्यांदा विक्री
इटालियन कलाकार मॉरिझिओ कॅटेलन यांनी केळ्याची ही खास कलाकृती तयार केली आहे. या केळ्याला कॉमेडियन असं नाव देण्यात आलं. २०१९ मध्ये पेरोटिन गॅलरी यांनी याची प्रथम विक्री केली होती.
जस्टिन सन ट्रम्प समर्थक
क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म ट्रॉनचे संस्थापक जस्टिन सन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. ट्रम्प यांनी क्रिप्टोला दिलेल्या पाठिंब्याचंही त्यांनी कौतुक केलं आहे. जस्टिन सन यांच्यावर अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशननं गेल्या वर्षी फसवणुकीचा आणि इतर सिक्युरिटीज कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता.
२०१३ मध्ये रिपल लॅब्समध्ये मुख्य प्रतिनिधी आणि सल्लागार म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर २०१४ मध्ये पेवो नावाचं ऑडिओ बेस्ड सोशल नेटवर्किंग अॅप सुरू करण्यात आलं. २०१७ मध्ये या व्यावसायिकाने ट्रॉनची स्थापना केली. हे क्रिप्टो मार्केटमध्ये सक्रिय ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. ट्रॉन आता जगातील अव्वल क्रिप्टोकरन्सीपैकी एक मानली जाते.