नवी दिल्ली: यंदाच्या सणासुदीच्या काळात जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. कांदा आणि डाळीचा पुरेसा शिलकी साठा असल्यामुळे डिसेंबरपर्यंत त्यांच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहितकुमार सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. सिंह यांनी सांगितले की, सरकारकडे २.५ लाख टनांपेक्षा अधिकचा कांदा साठा आहे.
तसेच ५४ लाख टन कांदा राज्यांना पाठविण्यातही आला आहे. याशिवाय उडीद, मूग आणि मसूर डाळीचा शिलकी साठा ४३ लाख टन आहे. विविध योजनांसाठी ८ रुपये प्रतिकिलो दराने ८८ हजार टन चणा डाळ राज्यांना पुरविण्यात आली आहे. खरिपाच्या कांद्यास अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तथापि, शिलकी साठा असल्यामुळे ही घट भरून निघेल.
केंद्रीय साठ्यातून ८०० रुपये क्विंटल दराने कांदा
राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मदर डेयरी, सफल, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार यांना केंद्रीय साठ्यामधून ८०० रुपये क्विटल दराने कांदा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. टोमॅटो आणि बटाटे यांच्या किमतीत मात्र चढ-उतार होऊ शकतात.