Join us

अदानींनी बत्ती केली गुल, आता बांगलादेशला आलं शहाणपण; ६७०० कोटींची थकबाकी देण्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 4:22 PM

Bangladesh Adani Power : झारखंडमधील गोड्डा प्रकल्पातून बांगलादेशला वीज निर्यात करणाऱ्या कंपनीनं थकबाकीमुळे वीजपुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. यानंतर आता बांगलादेशनं थकबाकी देण्यासाठी प्रक्रिया जलद केलीये.

Bangladesh Adani Power : बांगलादेशनं भारतातील खासगी वीज उत्पादक कंपनी अदानी पॉवरला (Adani Power) थकीत ८०० मिलियन डॉलर (सुमारे ६७०० कोटी रुपये) देण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. झारखंडमधील गोड्डा प्रकल्पातून बांगलादेशला वीज निर्यात करणाऱ्या कंपनीनं थकबाकीमुळे वीजपुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा आयात करण्यात कंपनीला अडचणी येत असल्यानं अदानी पॉवरनं बांगलादेश सरकारला आपली थकबाकी लवकर भरण्यास सांगितलंय.

सरकारचे प्रयत्न सुरू

गौतम अदानी यांच्या मालकीची ही कंपनी बांगलादेश सोबतच्या करारानुसार विजेची निर्यात करते. बांगलादेशच्या ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार मोहम्मद फुजुल कबीर खान यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशनं गेल्या महिन्यात अदानी पॉवरला ९६ मिलियन डॉलर्स दिले होते आणि या महिन्यासाठी १७० मिलियन डॉलर्स देण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं जाणार आहे.

बांगलादेशसमोर 'हे' संकट

गेल्या काही वर्षांत महाग होत चाललेलं इंधन आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं बांगलादेशला बिलं भरणं कठीण झाले आहे. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक ऊर्जेच्या किंमतींमध्ये अस्थिरता दिसून आली आहे, ज्यामुळे बांगलादेशवरील आर्थिक दबाव आणखी वाढलाय. याशिवाय ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हटवण्याच्या प्रयत्नासह अलीकडील राजकीय अस्थिरतेमुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी गुंतागुंतीची झाली आहे.

या वादाचा आणि पुरवठा कपातीचा बांगलादेश आणि अदानी पॉवर यांच्यातील संबंधांवर काय परिणाम होईल हे येत्या काळात कळेल. बांगलादेशची सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक बाजारपेठेतील इंधनाचे वाढते दर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाचा तुटवडा यामुळे देशाची वीज पुरवठा व्यवस्था धोक्यात आली आहे.

टॅग्स :अदानीबांगलादेशगौतम अदानी