नवी दिल्ली : देशातील तिसर्या क्रमांकाची सरकारी बँक ‘BoB’ (बँक ऑफ बडोदा) च्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. या कपातीनंतर बीआरएलएलआर(BRLLR ) 6.85 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. (bank of baroda cuts lending rate by 10 bps now latest rates is 6.75 percent)
आजपासून बँकेचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच ग्राहकांना आजपासून स्वस्त दरात कर्ज मिळेल. व्याजदरात घट झाल्यामुळे सर्वसामान्यांना वाहन कर्ज, गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याज दर कमी द्यावे लागेल.
दरम्यान, बँकेने केलेल्या कपातीचा फायदा गृहकर्ज (Home Loan), तारण कर्ज (Mortgage Loan), वाहन कर्ज (Car Loan), शैक्षणिक कर्ज (Education Loan), वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आणि इतर सर्व प्रकारची कर्जे घेणाऱ्यांना होणार आहे.
व्याज दर किती असेल
बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कपातीनंतर गृह कर्जावरील व्याज दर 6.75 टक्के होईल. या व्यतिरिक्त वाहन कर्जावर 7 टक्के असेल. तसेच, तारण कर्जावरील 7.95 टक्के आणि शिक्षण कर्जावर 6.75 टक्के असणार आहे.
चेक करा एसबीआयचे दर
यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांनीही व्याज दरात कपात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानेही गृह कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सिबिल स्कोअरच्या आधारावर गृह कर्जात जवळपास 0.1 टक्के सवलत जाहीर केली आहे. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज 6.70 च्या किमान व्याजदराचे झाले आहे.
एचडीएफसीने व्याज दर किती कमी केले आहे?
एचडीएफसीने देखील आपल्या गृह कर्जासाठी व्याज दरात नुकतीच कपात करण्याची घोषणा केली होती. एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी गृह कर्जावर व्याज दरात 5 बेसिस प्वाईंट म्हणजेच 0.05 टक्के कपात केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कपातीनंतर गृह कर्जाचा इतिहास चांगला असणाऱ्या 'सर्वोत्कृष्ट ग्राहकांना' 6.75 टक्के व्याजदराने गृह कर्ज उपलब्ध होईल.
आयसीआयसीआय बँकेचे दर
आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जावरील व्याजदर 6.70 टक्क्यांपर्यंत खाली आणले आहेत. गेल्या दहा वर्षात बँकेचा हा सर्वात स्वस्त गृह कर्जाचा दर आहे. हा कर्ज दर आजपासून लागू करण्यात आला आहे.