Join us

'या' तीन बँकांमध्ये असतील खाती, तर वाढू शकते डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 5:40 PM

मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयाचा कोट्यवधी खातेधारकांवर होणार परिणाम

मुंबई: मोदी सरकारनं काल घेतलेल्या मोठ्या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी लोकांवर होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँकेच्या विलीनीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे देशातील तिसरी सर्वात मोठी बँक तयार होईल. सध्याच्या घडीला स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेचा क्रमांक लागतो. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँकेच्या विलीनीकरणामुळे सर्वसामान्य खातेधारकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या विलीनीकरणाचा परिणाम खातेधारकांवर हळूहळू होईल, अशी माहिती एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सुनील पंत यांनी दिली. 'बँकेच्या खातेधारकांवर विलीनीकरणाचा लगेच परिणाम होणार नाही. मात्र हळूहळू बँकांचे चेकबुक, खाते क्रमांक आणि कस्टमर आयडी बदलू शकतो. यासोबतच नवी बँक अस्तित्वात आल्यानंकर ग्राहकांना केवायसीची प्रक्रिया करावी लागू शकते,' अशी माहिती पंत यांनी दिली. मात्र यामुळे कर्जावर आणि ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. बँकांच्या विलीनीकरणानंतर बँकेच्या शाखांचे आयएफएससी कोड बदलू शकतात, अशी माहिती पंजाब एँड सिंध बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक जी. एस. बिंद्रा यांनी दिली. याशिवाय काही शाखा बंददेखील होऊ शकतात. मात्र याचा अंतिम निर्णय बँकेच्या संचालक मंडळाचा असेल, असं त्यांनी सांगितलं. बँकांच्या विलीनीकरणामुळे देना आणि विजया बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याची चर्चा होती. मात्र या बँकांमधील कोणाच्याही नोकरीवर कुऱ्हाड कोसळणार नसल्याची माहिती काल केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल दिली.  

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँक ऑफ इंडियाआयसीआयसीआय बँकबँकनरेंद्र मोदी