जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुढील महिन्यापासून बँक आपल्या चेक पेमेंटच्या नियमात बदल करणार आहे. चेक पेमेंटद्वारे होणाऱ्या फसवणुकीवर आळा घालण्यासाठी बंकेनं मोठा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून बँक चेक पेमेंटसाठी ‘Positive pay confirmation’ अनिवार्य करणार आहे. याअंतर्गत जर एखाद्या ग्राहकांनं २ लाखांपेक्षा अधिक रक्कम चेकद्वारे दिली तर ग्राहकाला पुन्हा एकदा त्याचं कन्फर्मेशन करावं लागेल. ग्राहकाच्या परवानगीशिवाय ते ट्रान्झॅक्शन पूर्ण होणार नाही.
बँकेनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे बँक ऑफ बडोदानं १ जानेवारी २०२१ पासून सेंट्रलाईज्ड पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजेच सुरू केलं आहे. यामध्ये सांगितल्याप्रमाणे ग्राहकांनी जर मोठ्या रकमेचं ट्रान्झॅक्शन केलं असेल किंवा करणार असतील तर त्याच्या बेनिफिशरीची माहिती बँकेला देण्याचं आवाहन केलं आहे. असं केल्यास चेक क्लिअरिंगच्या वेळी पुन्हा कन्फर्मेशन केलं जाणार नाही.
बँकेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये ५० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या चेकसाठीही बँकेतर्फे कन्फर्मेशन केलं जाऊ शकतं. ग्राहक नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा ब्रान्चमध्ये फोन करत अथवा 8422009988 या क्रमांकावर फोन करून कन्फर्मेशन देऊ शकतात. यासाठी बेनिफिशरीचं नाव, अमाऊंट, चेकची तारीख, खात्याचा क्रमांक आणि चेकचा क्रमांक शेअर करणं अनिवार्य आहे.