Join us

CoronaVirus: काळजी संपली! ही बँक गृह अन् वाहन कर्जाच्या EMIचे कापलेले पैसे देतेय परत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 4:45 PM

रिझर्व्ह बँकेने 1 मार्च ते 31 मे 2020 या कालावधीत सर्व प्रकारच्या कर्जावर (टर्म लोन) मासिक हप्त्यांवर तीन महिन्यांची स्थगिती देण्याचा सल्ला बँकांना दिला होता.

नवी दिल्लीः सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ बडोदानं ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. मार्च महिन्यात गृह अन् वाहन कर्जावरचे वसूल केलेले हप्ते या बँकेनं परत करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटात ग्राहकांना या पैशांचा वापर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी करता येईल, असा बँकेचा उद्देश आहे. बँकेनं हा पर्याय फक्त गृह आणि वाहन कर्ज घेतलेल्या ग्राहकांना दिला आहे. रिझर्व्ह बँकेने 1 मार्च ते 31 मे 2020 या कालावधीत सर्व प्रकारच्या कर्जावर (टर्म लोन) मासिक हप्त्यांवर तीन महिन्यांची स्थगिती देण्याचा सल्ला बँकांना दिला होता. म्हणजे ग्राहकांना हप्त्यांवर स्थगिती द्यायची की नाही हे बँकांसाठी ऐच्छिक होतं. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता सध्या सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे लोकांच्या कर्जाच्या रकमेचा भार हलका करण्यासाठी केंद्रीय बँकेने ही घोषणा केली होती. त्यानुसार अनेक बँकांनी तीन महिने हप्ते भरण्यास स्थगिती दिली होती. आरबीआयच्या घोषणेपूर्वीच हप्त्यात कपातबँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा म्हणाले, काही प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या घोषणेपूर्वीच हप्त्याची कपात करण्यात आली होती. तर त्याची अंमलबजावणी 1 मार्च 2020पासून करण्यात झाली होती. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या कर्जदारांना (घर आणि वाहन कर्ज घेणा-यांना) हा पर्याय देत आहोत. ग्राहक यासंदर्भात आम्हाला विनंती करू शकतात आणि आम्ही खात्रीशीररीत्या मासिक हप्त्याची कापलेली रक्कम त्यांना परत सुपूर्द करू. कारण अशा परिस्थितीत कर्जदारास पैसे साठवून जवळ ठेवावे लागतात. चढ्ढा म्हणाले, "मला विश्वास आहे की, आरबीआयच्या सल्ल्याचं सर्वच जण पालन करतील. तसेच आम्ही सुनिश्चित करू इच्छितो की, जेव्हा ग्राहकांच्या हिताचा विचार येतो, तेव्हा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींची अंमलबजावणी करू." पूर्ण ईएमआय (मूळ रक्कम आणि व्याज) म्हणजेच व्याजासकट कर्जाच्या हप्त्याची रक्कम परत करण्याची आम्ही ऑफर देत आहोत. तीन महिन्यांच्या मुदतीच्या कालावधीत कर्जाचा हप्ता न भरण्यास बँक ग्राहकांना कोणत्याही प्रकारची विचारणा करणार नाही. ज्या कर्जदारांचे आधीच हप्ते कापण्यात आलेले आहेत, त्यांच्याशी बँक संपर्क साधत आहे.बँकेकडून ग्राहकांना दिला जातोय एसएमएस ते पुढे म्हणाले, आम्ही एसएमएसद्वारे संदेश पाठवत आहोत आणि ग्राहक आम्हाला उत्तर देऊ शकतात. आम्ही ग्राहकांचे हप्ते स्थगित केलेले आहेत. तरीसुद्धा कोणत्याही ग्राहकाला कर्जाच्या हप्ताचे पैसे परत नको असल्यास त्यांनी तसे कळवावे. "आरबीआयच्या तीन महिन्यांच्या मुदतवाढीबाबत स्पष्टीकरण देताना चढ्ढा म्हणाले की, व्यावसायिक कर्जाच्या बाबतीत थकित कर्जावरील व्याज तीन महिन्यांच्या मुदतीच्या नंतर देय असेल. घर आणि वाहन कर्जाचा प्रश्न आहे, तर या प्रकरणात आम्ही कर्जाचा कालावधी वाढवत आहोत. यामुळे कर्जाचा कालावधी तीन महिन्यांचा असेल. म्हणजेच कर्जदाराला तीन महिने कर्जावरच्या हप्त्यांची काळजी करण्याची गरज नाही. "

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या