लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाखा बंद करण्याचे वाढलेले प्रमाण, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर एकतर्फी मनमानी निर्णय, नोकर भरती, बेकायदेशीर बदल्यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी ३० आणि ३१ मे रोजी संपाचा इशारा दिला आहे. यामुळे बँकांचे काम ठप्प राहणार असून, याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.
सेंट्रल बँकेच्या शेकडो शाखा बंद करण्याचा निर्णय बँक व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच अनेक बँकांत आउटसोर्सिंगद्वारे काम केले जात आहे. याला बँक कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. सरकारच्या विविध योजना बँकांतर्फे राबविण्यात येत असून, बँकांवर कामाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त झाले असून, बँक कर्मचारी मोठ्या तणावात काम करीत आहेत. यामुळे नोकरभरती सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी केली आहे.