नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, 2017-18 या वित्तीय वर्षात भारतीय बँकांमध्ये जवळपास 41 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे ही घोटाळ्यांची ही वाढ 72 टक्के एवढी मोठी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सन 2013-14 पासून तब्बल चारवेळी या घोटाळ्यांची आकडेवारी आणि रक्कम वाढल्याचेही अहवालतून उघड झाले आहे.
भारतीय बँकींग प्रणालीत होणारे घोटाळे ही अतिशय चिंतेची बाब बनली आहे. भारतीय बँकांमध्ये 2017-18 या कालावधीत विक्रमी घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तब्बल 42 हजार कोटींचा हा घोटाळा आहे. सन 2016-17 मध्ये या घोटाळ्याची रक्कम 23,934 कोटी रुपये होती. गतवर्षी घोटाळ्याची ही रक्कम तब्बल 72 टक्क्यांनी वाढली आहे. सन 2013-14 पासून ही किंमत तब्बल चारवेळा वाढली आहे.
आरबीआयच्या अहवालानुसार, सन 2017-18 मध्ये सर्वाधिक उलाढाल ही दागिन्यांमध्ये झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा संदर्भ देत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असल्याचे सेंट्रल बँकेने म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यातली या घोटाळ्यात तब्बल 13000 कोटींचा अपहार झाल्याचंही बँकेने स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे, 2017-18 या वर्षात झालेल्या घोटाळ्यांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त घोटाळे हे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या रकमेचे आहेत. बँक घोटाळ्यातील आकड्यांचा विचार केल्यास 2016-17 मध्ये 5076 बँक घोटाळे झाले असून 2017-18 मध्ये ही संख्या 5917 वर पोहोचली असल्याचे आरबीआयने आपल्या अहवालात स्पष्ट केलंय. गतवर्षी नोंद करण्यात आलेल्या बँक घोटाळ्यांमध्ये 2000 खटले हे सायबर क्राईमशी संबंधित असून त्यांची रक्कम 109.6 कोटी रुपये तर 2016-17 मध्ये ही खटल्यांची संख्या 1372 असून घोटाळ्याची रक्कम 42.3 कोटी रुपये एवढे होती.