Join us  

Bank Loan: एसबीआय आणि Axis बँकेने वाढवले कर्जावरील व्याजदर, एवढी वाढणार तुमची EMI  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 3:32 PM

Bank Loan: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या कर्जांवरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने सोमवारी सांगितले की, इंटर्नल बेंचमार्कशी संबंधित व्याजदरांमध्ये ०.१० टक्के वाढ केली आहे.

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या कर्जांवरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने सोमवारी सांगितले की, इंटर्नल बेंचमार्कशी संबंधित व्याजदरांमध्ये ०.१० टक्के वाढ केली आहे. बँकेने सांगितले की, नवे व्याजदर हे १५ एप्रिलपासून लागू होणार आहेत. तर खासगी क्षेत्रातील आपल्या व्याजदरांमध्येही ०.५ टक्के वाढ केली आहे.

एसबीआयने सकाळी सांगितले की, सर्व कालावधीच्या कर्जासाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंगमध्ये १० आधारभूत अंक म्हणजे ०.१० टक्क्यांची वाढ केली आहे. जी १५ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहे. या निर्णयानंतर बँकेचे सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. मात्र याचा परिणाम अशा कर्जांवर पडणार नाही जी रेपोरेटसारख्या बाहेरील बेंचमार्कशी संबंधित असतील. 

एसबीआयच्या संकेतस्थळानुसार एक दिवस, महिना आणि तीन महिने कालावधी असलेल्या कर्जाचे व्याज दर वाढून ६.७५ टक्के झाले आहेत. हे व्याजदर आधी ६.६५ टक्के होते. त्याचप्रमाणे एक वर्षाच्या कर्जाची एमसीएलआर ७ टक्क्यांवरून वाढवून ७.१० टक्के करण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या कर्जाची एमसीएलआर ६.९५ टक्क्यांवरून वाढवून ७.५ टक्के करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कर्जावरील एमसीएलआरलासुद्धा १० आधार अंकांनी वाढवून ७.३० टक्के करण्यात आली आहे. तर तीन वर्षांचे कर्ज आता ७.४० टक्क्यांच्या सुरुवाती व्याजदरावर मिळेल.

खासगी क्षेत्रातील अॅक्सिक बँकेनेही आपले कर्ज महाग केले आहे. आपल्या एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच नवे दर १८ एप्रिलपासून लागू केले आहेत. आता नवे दर हे १८ एप्रिलपासून लागू होणार आहेत. एमसीएलआर कुठल्याही बँकेच्या अंतर्गत खर्च आणि खर्चाच्या आधारावर व्याज दर निश्चित करण्याचे मानक आहे. तर बहुतांश बँका रेपोरेटशी संबंधित कर्जवाटप करतात. यामध्ये कुठलाही बदल हा आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल करते तेव्हा होतो.

जर कुणी एसबीआयकडून २० लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेतले असेल,  आणि त्यावर ७ टक्के व्याजदर असेल. तर त्याला १५ हजार ५०६ रुपये ईएमआय असेल. मात्र आता व्याजदर ७.१० टक्के झाल्याने ईएमआय वाढून तो १५ हजार ६२६ रुपये होईल. अशा प्रकारे दरवर्षीच्या ईएमआयमध्ये १ हजार ४४० रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.  

टॅग्स :बँकिंग क्षेत्रस्टेट बँक आॅफ इंडियाबँक