पुणे: खर्चात कपात करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रनं 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व शाखा शहरातील असल्याची माहिती बँकेच्या पुणे येथील मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. राज्याच्या शहरी भागातील 51 शाखांमधून बँकेला फारसं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली. राज्यात बँक ऑफ महाराष्ट्रचं मोठं जाळं आहे. शहरासह ग्रामीण भागातदेखील बँकेच्या शाखा आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील शाखांची एकूण संख्या 1900 इतकी आहे. यापैकी महाराष्ट्राच्या शहरी भागातील 35 शाखा लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. या शाखांमधील ग्राहकांची खाती जवळच्या शाखांमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यानंतर बंद करण्यात आलेल्या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड रद्द करण्यात येतील. राज्यातील कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं आतापर्यंत शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे असं पाऊल उचलणारी बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्यातील पहिलीच बँक आहे. बंद केल्या जाणाऱ्या 51 शाखांमधील ग्राहकांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचं चेकबुक जमा करावं लागणार आहे. या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड 31 डिसेंबरनंतर रद्द होतील. या जिल्ह्यांमधील इतक्या शाखा बंद होणार- ठाणे (7), मुंबई (6), पुणे (5), जयपूर (4), नाशिक (3), अमरावती, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, सातारा (प्रत्येकी 2), सोलापूर, कोल्हापूर (प्रत्येकी 1).
बँक ऑफ महाराष्ट्र 51 शाखा बंद करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 6:17 PM