देशातील प्रमुख सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच केली. या विलीनीकरणानंतर राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या २७ वरून १२ वर येणार आहे. पंजाब नॅशनल बँकमध्ये दोन बँका विलीन होणार आहेत. ऑरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. त्यासोबतच, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक विलीन होणार आहेत. कॅनरा बँकेत सिंडिकेट बँक विलीन होईल आणि इंडियन बँकेत अलाहाबाद बँक विलीन होणार आहे. म्हणजेच, आजच्या दहा बँकांच्या चार बँका होतील.
या विलीनीकरणानंतर उलाढालीच्या बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडियाच अव्वल क्रमांकाची बँक असेल, तर पंजाब नॅशनल बँक ही दुसऱ्या क्रमांकाची बँक ठरणार आहे. या विलीनीकरणामुळे कुणाचीही नोकरी जाणार नसल्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली आहे. परंतु, बँकांमधील खातेदारांवर विलीनीकरणाचा काय परिणाम होईल, खात्याशी संबंधित काय-कसे बदल करावे लागतील, याबद्दल बऱ्याच शंका आहेत. परंतु, काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर त्यांचे बाकी सगळे व्यवहार सुरळीत सुरू राहतील, असं आतातरी दिसतंय.
खाते क्रमांक बदलण्याची शक्यता
बँकांच्या विलीनीकरणानंतर आपला बँक अकाउंट नंबर बदलू शकतो. त्यामुळे आत्ताच्या बँक खात्याशी जोडलेला ई-मेल आणि मोबाईल नंबर योग्य आहे ना, याची एकदा खातरजमा करून घ्या. त्यावर आपल्याला नवा खाते क्रमांक कळवला जाऊ शकतो. तसंच, विलीन होणाऱ्या दोनही बँकांमध्ये आपलं खातं असेल तर सिंगल कस्टमर आयडी तयार होऊन आपल्याला एकच खाते क्रमांक दिला जाऊ शकतो.
आयएफएससी कोड अन् आर्थिक देवाणघेवाण
बँक विलीनीकरणानंतर कदाचित आपल्या ब्रँचचा आयएफएससी कोड बदलू शकतो. हा कोड सर्व संबंधित व्यक्तींना, संस्थांना कळवणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच जणांचा पगार, डिव्हिडेंड थेट बँक खात्यात जमा होतो, काही बिलं या खात्याशी जोडलेली असतात, त्यांची रक्कम ठरावीक तारखेला 'ऑटो डेबिट' होते. या सर्व ठिकाणी आपला खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड न विसरता अपडेट करावा.
बँकेची शाखा आणि क्रेडिट/डेबिट कार्डचं काय?
विलीनीकरणानंतर एकाच परिसरात एकाच बँकेच्या दोन शाखा असतील, तर एखादी शाखा बंद केली जाऊ शकते. तसंच, ज्या बँकेत विलीनीकरण होणार आहे, त्या अँकर बँकेकडून खातेदारांना नवं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड दिलं जाऊ शकतं. समजा, तुमचं खातं कॉर्पोरेशन बँकेत आहे. ही बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होतोय. अशावेळी, तुम्हाला यूबीआयकडून नवं कार्ड मिळू शकतं.
दरम्यान, आपल्या खात्यातील पैसे बँकांच्या विलीनीकरणानंतरही सुरक्षित राहतील. तसंच, बँकेचं कर्ज, त्याचा ईएमआय या गोष्टींही आजच्यासारख्याच पुढे सुरू असतील.
कुणाची किती उलाढाल?
क्रमांक | बँक | उलाढाल (मार्च २०१९च्या आकड्यांनुसार) |
१. | स्टेट बँक ऑफ इंडिया | ५२.०५ लाख कोटी रुपये |
२. | पंजाब नॅशनल बँक | १७.९४ लाख कोटी रुपये |
३. | बँक ऑफ बडोदा | १६.१३ लाख कोटी रुपये |
४. | कॅनरा बँक | १५.२० लाख कोटी रुपये |
५. | युनियन बँक ऑफ इंडिया | १४.५९ लाख कोटी रुपये |
६. | बँक ऑफ इंडिया | ९.०३ लाख कोटी रुपये |
७. | इंडियन बँक | ८.०८ लाख कोटी रुपये |
८. | सेंट्रल बँक ऑफ इंडिया | ४.६८ लाख कोटी रुपये |
९. | इंडियन ओव्हरसीज बँक | ३.७५ लाख कोटी रुपये |
१०. | युको बँक | ३.१७ लाख कोटी रुपये |
११. | बँक ऑफ महाराष्ट्र | २.३४ लाख कोटी रुपये |
१२. | पंजाब अँड सिंध बँक | १.७१ लाख कोटी रुपये |